कणकवली – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एस्.टी.चे) राज्यशासनात विलीनीकरण करा, या मागणीसह अन्य मागण्यांसाठी गेले अनेक दिवस चालू असलेल्या कर्मचार्यांच्या संपावर अद्याप तोडगा निघालेला नाही. असे असतांना पोलीस बंदोबस्तात येथील आगारातून कणकवली ते सावंतवाडी या मार्गावर ६ डिसेंबरला दुपारी एस्.टी. बस सोडण्यात आली; मात्र या बसमध्ये प्रवासी नव्हते.
एस्.टी.च्या सिंधुदुर्ग विभागाचे नियंत्रक प्रकाश रसाळ, पोलीस अधिकारी आणि एस्.टी.चे अन्य अधिकारी यांच्या साहाय्याने ही बससेवा चालू करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कणकवली आगारात हाताच्या बोटावर मोजण्याएवढे चालक कामावर आले आहेत; परंतु एकही वाहक (कंडक्टर) कामावर उपस्थित झालेला नाही. त्यामुळे वाहकाची सेवा एस्.टी.च्या नियंत्रकांकडे देण्यात आली आहे.