कायद्याचे ज्ञान घेऊन प्रभावीपणे राष्ट्र आणि धर्मकार्य चालू ठेवूया ! – अधिवक्ता खुश खंडेलवाल

‘हिंदु टास्क फोर्स’च्या वतीने आयोजित ‘कायदा प्रशिक्षण कार्यशाळे’ला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

अधिवक्ता खुश खंडेलवाल

भाईंदर (जिल्हा ठाणे) – राष्ट्र आणि धर्मकार्य करत असतांना अनेकदा विविध अडचणींना सामोरे जावे लागते, अशा वेळी कायद्याचे ज्ञान घेणे अनिवार्य झाले आहे. कायद्याचे ज्ञान घेऊन देवतांचे विडंबन, तसेच गोहत्या रोखणे यांसह राष्ट्र आणि धर्महानीच्या विविध घटना थांबवण्यासाठी पोलिसांत तक्रारी प्रविष्ट करणे, पोलीस-प्रशासनाला निवेदने देणे आदी कृती आपण करू शकतो. कायद्याचे ज्ञान घेऊन प्रभावीपणे राष्ट्र आणि धर्मकार्य अविरतपणे चालू ठेवूया, असे आवाहन ‘हिंदु टास्क फोर्स’चे संस्थापक अधिवक्ता खुश खंडेलवाल यांनी केले. ‘हिंदु टास्क फोर्स’ या संघटनेच्या वतीने भाईंदर येथे आयोजित केलेल्या ‘कायदा प्रशिक्षण कार्यशाळे’त ते बोलत होते.

या कार्यशाळेत भाईंदर, मीरा रोड आणि पालघर येथील सहभागी झालेल्या युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यशाळेत तक्रारी आणि निवेदनाचा मसुदा करणे, कायद्यातील विविध कलमे यांसह विविध सूत्रे समजावून सांगण्यात उपस्थितांचे शंकानिरसन करण्यात आले. ‘कायद्याचे प्रशिक्षण देण्याची ही पहिली कार्यशाळा पार पडल्यानंतर यापुढेही अशा कार्यशाळा घेण्यात येतील’, असे अधिवक्ता खुश खंडेलवाल यांनी स्पष्ट केले.