अपघातस्थळी पोचण्यास विलंब झाल्याने ३ पोलीस हवालदार सेवेतून निलंबित

पणजी, ५ डिसेंबर (वार्ता.) – अपघातस्थळी पोचायला विलंब झाल्याने पोलीस महासंचालक इंद्रदेव शुक्ला यांनी नियंत्रण कक्षाशी संलग्न (रोबोट सेवेतील) ३ हवालदारांना सेवेतून निलंबित केले.

कांपाल-मिरामार या रस्त्यावर ५ डिसेंबर या दिवशी सकाळी अपघात झाला आणि यामध्ये एक युवती आणि तिची आई घायाळ झाली. सकाळी फिरायला आलेले पोलीस महासंचालक इंद्रदेव शुक्ला हे घटनास्थळी उपस्थित होते. त्यांनी नियंत्रण कक्षात त्वरित संपर्क साधला; परंतु ‘रोबोट’ वाहन तब्बल २५ मिनिटांनी घटनास्थळी पोचले. याची नोंद घेऊन पोलीस महासंचालक इंद्रदेव शुक्ला यांनी याला उत्तरदायी असलेल्या ३ हवालदारांना सेवेतून निलंबित केले. (पोलीस महासंचालक इंद्रदेव शुक्ला स्वतः घटनास्थळी उपस्थित असल्याने त्यांना पोलीस वेळेत पोचायला हवेत, हे गांभीर्य लक्षात आले आणि हवालदारांवर कारवाई झाली; पण जेव्हा जनता अपघातस्थळी पोलीस वेळेत न पोचल्याची तक्रार करते, तेव्हा अशी कारवाई कधी पोलिसांवर केली जाते का ? तशी होणे अपेक्षित आहे, तरच पोलिसांना वेळेत पोचायची सवय लागेल ! – संपादक)