पुणे विभागात लाचखोरीची १०२ प्रकरणे उघडकीस !

लाचखोरीमध्ये महसूल विभाग प्रथम क्रमांकावर, तर पोलीस विभाग तिसर्‍या क्रमांकावर !

लाचखोरीमध्ये सरकारी विभाग अग्रस्थानी असणे प्रशासनाला लज्जास्पद ! पोलीस विभाग तिसर्‍या क्रमांकावर असेल, तर कायद्याचे राज्य कधीतरी येईल का ? खोलवर मुरलेला भ्रष्टाचार संपवण्यासाठी कठोर शिक्षाच हवी. – संपादक 

पुणे – पुणे विभागात लाच घेण्यामध्ये महसूल विभाग प्रथम क्रमांकावर असून स्थानिक स्वराज्य संस्था दुसर्‍या क्रमांकावर, तर पोलीस विभाग तिसर्‍या क्रमांकावर आहे, तसेच महावितरण, आरोग्य, कायदा आणि न्यायपालिका आदी विभागांमध्ये लाचखोरीची प्रकरणे उघडकीस आली आहेत. सरकारी ३३ विभागांमध्ये १०२ प्रकरणांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई केली आहे. त्यात महसूल विभागातील २६ प्रकरणे, तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महापालिका, जिल्हा परिषद, नगरपंचायत आणि नगरपरिषद मिळून लाचखोरीची १८ प्रकरणे उघडकीस आली, तर पोलीस विभागात १७ प्रकरणांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये १० प्रथमश्रेणी, २१ द्वितीय श्रेणी अधिकार्‍यांचा समावेश आहे. ६३ तृतीय श्रेणीतील, तर चतुर्थ श्रेणीतील ५ जणांचा समावेश आहे.

पुण्यातील ‘सजग नागरिक मंच’चे अध्यक्ष विवेक वेलणकर म्हणाले की, लाचखोरीविषयी लोकांमध्ये जागरूकता वाढली आहे; परंतु शिक्षेचे प्रमाण अल्प आहे. तेव्हा शिक्षेचे प्रमाण वाढणे आणि लाच घेणार्‍यांच्या नोकर्‍या जातील, तेव्हाच अशा घटनांना आळा बसेल.