सोलापूर – नुकतेच मुंबई दौर्यावर असतांना बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी एका कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी राष्ट्रगीताच्या ४ ते ५ ओळी उच्चारून राष्ट्रगीत पूर्ण न करता निघून गेल्या. ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री पदावर असून एका उत्तरदायी व्यक्तीकडून असे दायित्वशून्य कृत्य घडणे, हे पदाच्या प्रतिष्ठेला बाधा आणणारे आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्यावर ‘राष्ट्रीय सन्मानाचा अपमान रोखणे १९७१’च्या कलम ३ अंतर्गत गुन्हा नोंद करण्याची मागणी भाजप युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. (अशी मागणी का करावी लागते ? पोलीस स्वत:हून गुन्हा नोंद का करत नाहीत ? – संपादक) येथील फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे याविषयी तक्रार देण्यात आली.
भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रामभाऊ सातपुते यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी एकत्रित येऊन ही मागणी केली. या वेळी भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव समर्थ बंडे, तसेच अक्षय अंजिखाने, यतीराज होनमाने, विशाल बनसोडे, रोहित कोळकुर, अमित जनगोंड, विशाल शिंपी, कृष्णा डुमने, धानेश्वर वाडे, पवन जगझाप आदी कार्यकर्ते उपस्थित होते. पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, ममता बॅनर्जी यांची ही कृती देशाच्या राष्ट्रगीताप्रती असंवेदनशीलता आणि अपमान करणारी आहे.