दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वाचकांचे दैनिकाविषयीचे अभिप्राय !

तेजस्वी विचारांमधून अध्यात्माच्या संदर्भात असणार्‍या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळते ! – विनोद सत्यनारायण ओझा, इचलकरंजी, कोल्हापूर

मी प.पू. भक्तराज महाराज यांची प्रासादिक शिकवण, तसेच परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे तेजस्वी विचार यांचे नियमित वाचन करतो. प्रत्येक विचारात आणि शिकवणीत अध्यात्माच्या संदर्भात असणार्‍या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळते.

दैनिक ‘सनातन प्रभात’ प्रत्येक घराघरात पोचायला हवे ! – मधुसूदन लड्डा (कर सल्लागार), परळी (जिल्हा बीड)

मी मागील ८ ते १० वर्षांपासून दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन करतो. दैनिकामध्ये ज्या बातम्या असतात, त्या अन्य वृत्तपत्र किंवा वृत्तवाहिनी यांवर प्रसारित होत नाहीत. मी माझ्याकडे येणार्‍या अनेक लोकांना दैनिक ‘सनातन प्रभात’चे महत्त्व सांगतो. दैनिकाच्या माध्यमातून धार्मिक कृती कशा कराव्यात ?, आपली संस्कृती कशी जपावी ? यांविषयी सांगितले जाते, त्याप्रमाणे आम्ही धर्माचरण करतो. समाजातील लोक अन्य धर्मांच्या विरोधात बोलतात; मात्र त्यांना योग्य उत्तर काय द्यावे ? हे दैनिकातील माहितीद्वारे लक्षात येते. माझ्याकडे जे गिर्‍हाईक येतात, त्यांना वाचण्यासाठी मी दैनिक ‘सनातन प्रभात’ माझ्या पटलावरच ठेवतो. जेणेकरून त्यांनाही हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व लक्षात येईल. दैनिक ‘सनातन प्रभात’ प्रत्येक घराघरापर्यंत पोचायला हवे.

दैनिक ‘सनातन प्रभात’ उशीखाली ठेवून झोपल्यावर मुलांना शांत झोप लागणे

‘माझ्या दोन्ही मुलांना रात्री झोपेतून मध्येच जाग यायची. त्यांनी स्वतःहून माझ्याकडे दैनिक ‘सनातन प्रभात’ उशीखाली ठेवण्यासाठी मागितले. तसे केल्यापासून दोघांनाही शांत झोप लागते. झोपेतून जाग येण्याचा त्रास पूर्णपणे बंद झाला.’

– श्री. नीरज दरख, जालना (वाचक)

हिंदुत्वाचे खरे वृत्त लावणारे दैनिक म्हणून हिंदुत्वनिष्ठांना ‘सनातन प्रभात’ मोठा आधार !

संपूर्ण विश्वात कुठेही हिंदूंच्यावर अत्याचार झाल्यानंतर त्याचे सविस्तर वृत्त दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये सविस्तरपणे प्रसिद्ध करून हिंदूंना संघटित केले जाते. त्यामुळे हिंदूंविषयी कोणकोणत्या घटना घडत आहेत, याची माहिती हिंदूंना होऊन ते संघटित होतात, ते आंदोलने करतात. हिंदुत्वाची खरी बाजू मांडणारे म्हणून दैनिक ‘सनातन प्रभात’ हे हिंदुत्वनिष्ठांचा आधार झाले आहे. हिंदुत्वनिष्ठांचा दैनिक ‘सनातन प्रभात’वर मोठा विश्वास बसला आहे. त्यांना हे वृत्तपत्र वाचल्याशिवाय चैन पडत नाही.

– श्री. सचिन कौलकर, कोल्हापूर