दैनिक ‘सनातन प्रभात’चा वार्ताहर म्हणून सेवा करतांना आलेले विविध अनुभव

सांगली, कोल्हापूर आणि मुंबई येथे दैनिक ‘सनातन प्रभात’चा वार्ताहर म्हणून ईश्वराने सेवेची संधी दिली. ही सेवा करत असतांना ईश्वरी कृपेने मला आलेले अनुभव आणि शिकायला मिळालेली सूत्रे येथे देत आहे.

१. ‘मूर्ती लहान मात्र कीर्ती महान’ म्हणजे दैनिक ‘सनातन प्रभात’ !

दैनिक ‘सनातन प्रभात’चा वार्ताहर म्हणून सेवा करत असतांना एकदा मी मिरज येथील नवनियुक्त रेल्वे पोलीस अधिकार्‍याला भेटायला गेलो. ‘मी दैनिक ‘सनातन प्रभात’चा वार्ताहर आहे’, असे त्यांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘दैनिक सनातन प्रभात म्हणजे ‘मूर्ती लहान मात्र कीर्ती महान !’ हिंदूंवरील अन्यायकारक वृत्ते आणि धर्मांधांच्या विरोधातील वृत्ते त्यात येत असल्यामुळे हे दैनिक आम्हाला (पोलिसांना) कामाला लावते.’’

२. मिरज येथील दंगलीच्या वेळी धर्मांधांनी मारलेला एकही दगड न लागणे

वर्ष २००९ मध्ये मिरज (जिल्हा सांगली) येथे झालेल्या हिंदु-मुसलमान दंगलीच्या वृत्तसंकलनासाठी मी गेलो होतो. जाण्यापूर्वी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी मनोमन प्रार्थना केली. हिंदु-मुसलमान दगडफेक करत असतांना आम्ही सर्व पत्रकार एका चौकात अडकलो. चारही बाजूंनी दगड फेक होत होती; मात्र एकाही पत्रकाराला दगड लागला नाही. माझ्या दिशेने येणारे दगड बाजूला जाऊन पडायचे. अन्य लोक आणि पोलीस यांना दगड लागून ते घायाळ होत होते. ईश्वरानेच आम्हा पत्रकारांभोवती संरक्षककवच निर्माण करून आम्हाला वाचवले.

श्री. सचिन कौलकर

३. परात्पर गुरुदेवांनी सांगितल्याप्रमाणे प्रार्थना केल्यावर अधिवेशनकाळात कोणताही त्रास न जाणवणे

मुंबई येथे अर्थसंकल्पीय, तसेच पावसाळी आणि नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात दिवसभर वार्ता संकलित करण्याची सेवा असते. विधानसभा आणि विधान परिषदेत विरोधी पक्षातील आमदार सतत गोंधळ घालून कामकाज बंद पाडतात. तेथील वातावरण रज-तमाचे असते; मात्र तरीही केवळ ईश्वरकृपेमुळे मला तेथे सेवा करत असतांना कोणताही त्रास झाला नाही. माझ्याभोवती ईश्वराने संरक्षककवच निर्माण केले असल्याचे जाणवते. त्यामुळे मी दिवसभर न थकता तेथे सेवा करू शकतो.

याविषयी मी सूक्ष्मातून परात्पर गुरुदेवांना विचारल्यावर त्यांनी ‘अधिवेशनाच्या सेवेला जाण्यापूर्वी स्वतःभोवती संरक्षककवच निर्माण होऊ दे’, अशी प्रार्थना करण्यास सांगितली. तसे केल्यावर अस्वस्थता आणि थकवा असा कोणताही त्रास न जाणवता माझ्याभोवती ईश्वराचे कवच असल्याचे जाणवत होते.

४. अपकीर्ती करणारे वृत्त प्रसिद्ध न करण्यासाठी पोलीस अधिकार्‍याने दिलेले पैसे घेण्यास नम्रपणे नकार देणे आणि स्वतःची बाजू तत्त्वनिष्ठपणे मांडणे

एका पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकार्‍याने एका प्रकरणात सहस्रो रुपयांचा घोटाळा केल्यामुळे त्या पोलीस ठाण्याची अपकीर्ती झाली होती. इतर दैनिकांत त्याविषयी मोठ्या प्रमाणात बातम्या प्रसिद्ध झाल्याने तेथे नवीन आलेले पोलीस अधिकारी अस्वस्थ झाले होते. मी आणि दैनिक ‘तरुण भारत’चे पत्रकार श्री. सुभाष वाघमोडे आम्ही त्या पोलीस अधिकार्‍याला बातमीविषयी विचारल्यावर त्याने आम्हाला १ सहस्र रुपये देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या पोलीस ठाण्याची अपकीर्ती करणारे वृत्त प्रसिद्ध न करण्यासाठी ते आम्हाला पैसे देत होते. मी प्रथम स्पष्ट शब्दांत सांगून आणि नंतर त्यांना समजावून सांगून त्यांच्याकडून पैसे घेण्यास नकार दिला. शेवटी ते म्हणाले, ‘‘मी प्रथमच पैसे न घेणारे दोन पत्रकार पाहिले.’’ दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘पाकीट पत्रकारिता’ अस्तित्वात नाही, हेच खरे !

५. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वृत्ताची नोंद घेऊन श्री गणपति मंदिराच्या बाहेर ‘मेटल डिटेक्टर’ यंत्रणा बसवली जाणे

९ वर्षांपूर्वी सांगली येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते आणि हिंदुत्वनिष्ठ श्री. हणमंतराव पवार यांना एका धर्मांधाने ठार मारण्याची धमकी पत्राद्वारे दिली होती. पत्रामध्ये सांगली येथील संस्थानाचे श्रीमंत विजयसिंह पटवर्धन यांचे प्रसिद्ध श्री गणेशाचे मंदिर बाँबने उडवण्याची धमकी दिली होती. श्री. पवार यांनी याविषयी सांगली शहर पोलिसांना माहिती दिली होती; मात्र पोलिसांनी त्याकडे कानाडोळा केला. श्री. पवार यांनी ‘सांगलीच्या गणपति मंदिराला धक्का पोचवल्यास सांगलीमधील एकही मशीद ठेवणार नाही’, अशी चेतावणी वृत्ताद्वारे दिली. हे सविस्तर वृत्त दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झाल्यावर पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. पोलिसांनी शांतता समितीची बैठक घेऊन हिंदु-मुसलमानांना शांत केले. मंदिर व्यवस्थापनाने मंदिराबाहेर ‘मेटल डिटेक्टर’ यंत्रणा बसवली. केवळ ‘सनातन प्रभात’च्या वृत्तामुळे पोलीस कृतीशील झाले.

६. वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात राष्ट्र आणि धर्म जागृतीविषयी प्रबोधन करणारे एकमेव दैनिक ‘सनातन प्रभात’ !

इतर दैनिकांच्या वर्धापनदिनाला सर्वजण संबंधित संपादकांना पुष्पगुच्छ देऊन वर्धापनदिनाच्या शुभेच्छा देतात. छायाचित्र काढल्यावर चहा आणि अल्पाहार करून निघून जातात; मात्र दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिनानिमित्त विशेष कार्यक्रम घेतले जातात. वाचक, विज्ञापनदाते, हितचिंतक आणि हिंदुत्वनिष्ठ यांना दैनिक ‘सनातन प्रभात’विषयी मनोगत मांडण्याची संधी दिली जाते. राष्ट्र आणि धर्मजागृतीपर कार्यक्रम घेतले जातात. सर्वजण आनंदाने वर्धापनदिन साजरा करतात. संतांच्या उपस्थितीमुळे वातावरण चैतन्यमय होऊन त्या सात्त्विकतेचा लाभ सर्वांना होतो. याउलट इतर दैनिकांच्या वर्धापनदिनाच्या दिवशी राजकारणी, त्यांचे कार्यकर्ते, भ्रष्ट प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा वावर असल्याने वातावरण तमोगुणी होते. केवळ मसाला दूध आणि अल्पाहार यांसाठी बरेच लोक तेथे येतात. ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिनाला वाचक आणि हिंदुत्वनिष्ठ आपुलकीने येतात.

७. दैनिक ‘सनातन प्रभात’वर विविध बाजूंनी खोचक टीका होणे; पण दैनिक ‘सनातन प्रभात’ची बरोबरी एकही वर्तमानपत्र करू न शकणे

प्रथम सांगली आणि कोल्हापूर अशी दैनिक ‘सनातन प्रभात’ची आवृत्ती चालू झाल्यानंतर बर्‍याच जणांनी सनातन प्रभात म्हणजे जुने पुराण, पारंपरिक वर्तमानपत्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिल्लू अशी टीका केली. पुरोगामी, बुद्धीप्रामाण्यवादी आणि साम्यवादी यांना दैनिक ‘सनातन प्रभात’चे विचार रूचले नाहीत. २० वर्षांपूर्वी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ चालू झाल्यानंतर त्यातील चातुर्वर्ण्य व्यवस्थेवर टीका करून रिपब्लिकन पक्षाने मिरज येथे साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ची होळी केली होती; मात्र ‘विचारांचा प्रतिकार विचाराने करावा लागतो. दैनिक जाळून त्यातील विचार नष्ट होत नाहीत’, हे दैनिक ‘सनातन प्रभात’ने आपल्या विचारांद्वारे प्रखरपणे दाखवून दिले. बर्‍याच जणांनी ‘सनातन प्रभात’ला जात्यंधपणामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला; मात्र ‘सनातन प्रभात’मध्ये जातीयवादाला थारा देणारी वृत्ते प्रसिद्ध होत नसल्यामुळे पुरोगामी मंडळीचे प्रयत्न अयशस्वी ठरले. चारी बाजूंनी नास्तिक लोकांची अशी आक्रमणे होऊनही केवळ संत आणि श्रीकृष्ण यांच्या कृपेमुळे दैनिक ‘सनातन प्रभात’ची बरोबरी अद्याप एकाही वर्तमानपत्राने केलेली नाही.

८. परात्पर गुरुदेवांनी २४ घंटे वार्ताहराची सेवा दिली असल्याचे अनुभवता येणे

दैनिक ‘सनातन प्रभात’चा वार्ताहर असल्याने सकाळी उठल्यापासून बातम्या करण्याविषयीचेच विचार मनात येतात. बातम्या आणि लेख सिद्ध करतांना दृष्टीकोन आणि अन्य सूत्रे आपोआप सुचतात, ही ईश्वरी कृपा आहे. ‘प.पू. डॉक्टरांनी माझे प्रारब्ध संपवण्यासाठी मला जणू २४ घंटे वार्ताहराची सेवा दिली आहे’, हे अनुभवता येते.

– श्री. सचिन कौलकर, कोल्हापूर.