सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – कोरोनामुळे निधन झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकास ५० सहस्र रुपये आर्थिक (सानुग्रह) साहाय्य प्राप्त होण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह mahacovid19relief.in या संकेतस्थळावर अर्ज प्रविष्ट करावा. याकरिता अर्जदार स्वतः ‘सेतुसुविधा केंद्रा’तून किंवा ग्रामपंचायतीमध्ये ‘जन सेवाकेंद्रा’मधून अर्ज करू शकेल. अर्जदाराच्या अधिकोषाच्या (बँकेच्या) खात्यात आर्थिक साहाय्याची रक्कम जमा करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
अर्ज प्रविष्ट करतांना अर्जदाराच्या आधारकार्डची प्रत, मृत व्यक्तीच्या आधारकार्डची प्रत, मृत्यू प्रमाणपत्र, अर्जदाराचा आधारकार्ड जोडलेला (लिंक केलेला) बँक खाते क्रमांक, अर्जदाराच्या खात्याच्या रहित केलेल्या धनादेशाची प्रत, मृत्यूच्या कारणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र, आर्.टी.पी.सी.आर्. अहवालाची प्रत किंवा सी.टी. स्कॅन किंवा इतर वैद्यकीय कागदपत्रे, इतर जवळच्या नातेवाइकांचे आक्षेप नसल्याचे (ना-हरकत) स्वयं घोषणापत्र ही कागदपत्रे द्यावी लागतील. जर एखादे प्रकरण संमत झाले नाही, तर अर्जदाराने जिल्हा तक्रार निवारण समितीचे सदस्य सचिव, जिल्हा शल्यचिकित्सक, सिंधुदुर्ग यांच्याद्वारे जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्याकडे तक्रारअर्ज द्यावा. या तक्रार निवारण समितीस अशा प्रकरणांची सुनावणी घेऊन अंतिम निर्णय देण्याचे अधिकार असतील.
अधिक माहितीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय (दूरभाष क्र. ०२३६२-२२८९०१, २२८५४०), तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हा नियंत्रण कक्ष (दूरभाष क्र. ०२३६२-२२८८४७) किंवा क्र. १०७७ येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे नवीन रुग्ण किंवा मृत्यू नाही
सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या २४ घंट्यांत कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले नाहीत आणि एकाही रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद नाही. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ सहस्र ४५८ झाली आहे. सद्य:स्थितीत ४४ रुग्णांवर उपचार चालू आहेत. ३ डिसेंबरला कोरोनामुक्त रुग्णांची एकूण संख्या ५१ सहस्र ६९३ झाली आहे.
‘सिंधुदुर्ग विमानतळा’वर प्रवाशांची आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी होणार !
सिंधुदुर्ग – कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ हा प्रकार दक्षिण आफ्रिका आणि इतर काही देशांमध्ये आढळून आल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने घोषित केले आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने हवाई वाहतुकीने प्रवास करणार्या प्रवाशांवर निर्बंध लावले आहेत. त्या अनुषंगाने ‘ओमिक्रॉन’ विषाणूचा संसर्ग वाढलेल्या देशांमधून येणारे आंतरराष्ट्रीय प्रवासी मुंबई विमानतळावर उतरून पुढे विमानाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करू शकतात. जिल्ह्यात सिंधुदुर्ग (चिपी) विमानतळावर अशा प्रवाशांच्या तपासणीसाठी विमानतळ प्राधिकरणाद्वारे स्वतंत्रकक्षाची व्यवस्था करावी. या प्रवाशांची माहिती आरोग्य विभागास कळवावी. अशा प्रवाशांना ७ दिवस संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्याविषयी कार्यवाही करावी. या प्रवाशांची दुसर्या, चौथ्या आणि सातव्या दिवशी आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी करावी. यापैकी कोणत्याही चाचणीचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आल्यास प्रवाशाला रुग्णालयात भरती करावे. सर्व चाचण्यांचा अहवाल नकारात्मक (निगेटिव्ह) आल्यानंतर प्रवाशांना आणखी ७ दिवस गृहअलगीकरणात ठेवण्यात यावे, असा आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिला आहे.