सातारा येथील मंगळवार तळ्‍यातील माशांचा गुदमरून मृत्‍यू !

परिसरात दुर्गंधीचे साम्राज्‍य

प्रशासनाने माशांचा मृत्‍यू कशामुळे झाला याचे कारण शोधून त्‍यावर उपाययोजना काढावी आणि संबंधितांवर कारवाई करावी !

मृत माशांना तळ्‍याबाहेर काढतांना कर्मचारी

सातारा, ३ डिसेंबर (वार्ता.) – येथील मंगळवार तळ्‍यातील माशांचा अचानक गुदमरून मृत्‍यू झाला आहे. प्राणवायूअभावी हा मृत्‍यू झाल्‍याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. सध्‍या मंगळवार तळे परिसरामध्‍ये दुर्गंधीचे साम्राज्‍य पसरले असून नागरिकांचे आरोग्‍य धोक्‍यात आले आहे. सातारा नगरपालिकेने मृत माशांना तळ्‍याबाहेर काढण्‍याचे काम हाती घेतले आहे; मात्र पावसामुळे अडथळे निर्माण होत असून काम अत्‍यंत संथ गतीने चालू आहे.

शहराच्‍या पश्‍चिमेस असलेले मंगळवार तळे श्री गणेशमूर्ती विसर्जनामुळे नेहमीच चर्चेत असते; मात्र अनेक वर्षांपासून या तळ्‍यामध्‍ये श्री गणेशमूर्ती विसर्जनावर बंदी घालण्‍यात आली आहे. जेव्‍हा श्री गणेशमूर्तींचे विसर्जन होत होते, तेव्‍हा सातारा नगरपालिकेकडून काही वर्षांच्‍या अंतराने तळ्‍यातील गाळ काढला जात होता. त्‍यामुळे तळ्‍यातील पाण्‍याचा उपसा होत होता. श्री गणेशमूर्ती विसर्जनावर बंदी घातल्‍यापासून तळ्‍यातील पाण्‍याचा उपसा करण्‍यात आलेला नाही, तसेच मंगळवार तळे परिसरातील बांधकामे, अतिक्रमणे यांमुळे तळ्‍यातील पाण्‍याचा निचरा करणारे नैसर्गिक स्रोेत नष्‍ट झाले असून याविषयी कुणीही बोलत नाही. तळ्‍यातील पाणी आणि गाळ यांचा नियमित उपसा झाला, तर तळे स्‍वच्‍छ राहिल, असे परिसरातील नागरिकांचे म्‍हणणे आहे. त्‍यासाठी तळ्‍यामध्‍ये प्रतिवर्षी श्री गणेशमूर्ती विसर्जन झालेच पाहिजे, अशी मागणी आता पुन्‍हा जोर धरू लागली आहे.

प्‍लास्‍टर ऑफ पॅरिसच्‍या गाळामुळे प्राणवायुअभावी माशांचा मृत्‍यू ! – धर्मद्रोह्यांचा शोध

मंगळवार तळ्‍यातील माशांचा मृत्‍यू प्‍लास्‍टर ऑफ पॅरिसच्‍या गाळामुळे प्राणवायूअभावी झाला आहे, असा शोध शहरातील धर्मद्रोह्यांनी लावला आहे. गत ७-८ वर्षांहून अधिक काळ मंगळवार तळ्‍यामध्‍ये श्री गणेशमूर्ती विसर्जनास बंदी आहे, तसेच बंदी घातल्‍यानंतर एकदा तळ्‍यातील गाळ काढून तळे स्‍वच्‍छ आणि खोल करण्‍यात आले होते. यासाठी पालिकेने लाखो रुपये व्‍यय केले होते. आता तळ्‍यामध्‍ये पीओपीचा गाळ आला कुठून हा प्रश्‍न सूज्ञ सातारावासियांना पडला आहे.