हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाचा सराव करतांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधिकेला आलेल्या अनुभूती !

हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाचा सराव करतांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या सौ. भक्ती विश्वनाथ कुलकर्णी यांना आलेल्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती !

‘मी काही आठवड्यांपासून हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाचा सराव करत आहे. मी हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाचा ५ वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. मी गायनाचा सराव करत असतांना ‘वेगवेगळ्या गायकांचे राग ऐकून काय जाणवते ?’, याचाही अभ्यास करायला आरंभ केला. मला तीव्र आध्यात्मिक त्रास असल्याने आणि ‘संगीत’ ही आकाशतत्त्वाची साधना असल्याने मला त्रास देणार्‍या वाईट शक्तीला संगीतातील चैतन्य सहन झाले नाही. सरावाच्या वेळी मला आलेल्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

१. शास्त्रीय गायनाचा सराव करतांना आलेल्या त्रासदायक अनुभूती

१ अ. गुरूंना प्रार्थना करून सरावाला आरंभ करणे, गाण्याच्या शेवटी त्रास होणे आणि मनात नकारात्मक विचार येऊन चिडचिड होणे : एकदा सरावाच्या आरंभी माझ्या मनात ‘गुरूंमध्येच सर्व देवता आहेत’, असा विचार आला; म्हणून मी परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना केली. स्वर आणि अलंकार म्हणून झाल्यावर मी ‘मालकंस’ रागाची बंदीश (टीप १) गायली आणि श्री सरस्वतीदेवीचे ‘जय शारदे वागेश्वरी…’ हे स्तवन म्हटले. ते म्हणत असतांना शेवटी मला त्रास होऊ लागला आणि मी ते कसेबसे म्हणून थांबवले. (या लिखाणाचे टंकलेखन करत असतांनाही माझे डोके दुखत होते.) त्यानंतर माझ्या मनात पुढील नकारात्मक विचार येऊ लागले, ‘मला काही जमत नाही. माझे स्वर लागत नाहीत. मला गायनातून काही अनुभूती येत नाहीत. मला गायनाचा सराव करायला का सांगितला आहे ?’ त्या वेळी माझी चिडचिड होऊ लागली.

सौ. भक्ती कुलकर्णी

१ आ. सहसाधिकेने सांगितल्याप्रमाणे नृत्यातील काही मुद्रा केल्यावर मन शांत होणे आणि नंतर बंदिशीचा अर्थ लक्षात घेऊन ती भावपूर्ण म्हटल्यावर सकारात्मक वाटू लागणे : त्यानंतर त्रास होत असतांनाही मी प्रयत्नपूर्वक कृतज्ञता व्यक्त करून तेथून उठले. दुसर्‍या खोलीत होमिओपॅथी वैद्या आरती तिवारी नृत्याचा सराव करत होती. मी त्या खोलीत गेल्यावर तिने मला नृत्यातील काही मुद्रा करायला सांगितल्या. त्या केल्यावर माझे मन शांत झाले. नंतर तिने मला कोणत्याही रागाची बंदीश तिचा अर्थ लक्षात घेऊन भावपूर्ण म्हणण्यास सुचवले. मग मी ‘मालकंस’ रागाच्या बंदिशीचा अर्थ लक्षात घेऊन ती पुन्हा म्हटली आणि त्यानंतर मला सकारात्मक वाटू लागले.

१ इ. सरावात खंड पडल्यावर मनात नकारात्मक विचार येणे आणि सराव करतांना अस्वस्थ वाटणे : काही दिवस मला गायनाचा सराव करायला जमले नाही. त्यानंतर माझ्या मनात पुढील नकारात्मक विचार येत होते, ‘सराव करू नये. मला सराव करतांना त्यातील काहीच कळत नाही. मी ही सेवा का करत आहे ? माझा संगीताचा काहीच अभ्यास होत नाही.’ सराव करतांना मला त्रास देणार्‍या वाईट शक्तीलाही त्रास होऊन मला पुष्कळ अस्वस्थ वाटत होते.

२. शास्त्रीय गायनाचा सराव चालू केल्यापासून आलेल्या अन्य त्रासदायक अनभूती

अ. उत्तरदायी साधिकेने मला संगीताचा सराव करण्याविषयी विचारल्यावर मला अस्वस्थ वाटले आणि मला पुष्कळ आध्यात्मिक त्रास होऊ लागला.

आ. ‘झोपेत मला कुणीतरी बिछान्यावरून खाली ओढत आहे. पलंगावरून ढकलून खाली पाडण्याचा प्रयत्न करत आहे’, असे मला जाणवते.

इ. पौर्णिमेच्या दिवशी झोपेत कुणीतरी मला पलंगावरून ढकलल्यामुळे मी खाली पडून माझा उजवा हात दुखावला गेला होता. त्यामुळे मी काही दिवस सेवा करू शकले नाही.

३. शास्त्रीय गायनाच्या सरावाच्या वेळी आलेल्या चांगल्या अनुभूती

३ अ. स्वरांचा सराव करतांना एकेक पायरी देवाच्या जवळ जात असल्याचे जाणवणे आणि ‘प्रत्येक स्वराला त्याचा विशिष्ट रंग आहे’, असे वाटणे : एकदा सराव करत असतांना मी परात्पर गुरु डॉक्टर, श्री गणेश, श्री सरस्वतीदेवी आणि भगवान शिव यांना प्रार्थना केली अन् ‘तुमच्या कृपेमुळे मला सराव करण्याची संधी मिळत आहे’, अशी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. मी जवळजवळ १५ वर्षांनी गायनाचा सराव करत होते. त्यामुळे मी केवळ सात स्वर म्हणत सरावाला आरंभ केला. सप्तस्वरांपैकी एकेक स्वर म्हणत असतांना ‘मी एकेक पायरी चढून देवाकडे जात आहे’, असे मला जाणवत होते. स्वर म्हणत असतांना ‘प्रत्येक स्वराला त्याचा विशिष्ट रंग आहे’, असा विचार माझ्या मनात आला. त्यानंतर मी ‘सा’ आणि ‘रे’ हे स्वर म्हटले. तेव्हा मला ‘त्यांचा रंग अनुक्रमे पांढरा आणि पिवळा आहे’, असे जाणवले.

३ आ. पुष्कळ वर्षांनी गायनाचा सराव करत असूनही गुरुकृपेने अलंकार सहजतेने म्हणता येणे आणि सरावाच्या शेवटी हलके अन् सकारात्मक वाटणे : थोड्या वेळाने मी अलंकार (टीप २) म्हणायला आरंभ केला. प्रत्यक्षात मी पुष्कळ वर्षांनी गायन करत असूनही मला ते अलंकार सहजतेने म्हणता येत होते. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘गुरूंच्या कृपेविना कोणतीच गोष्ट शक्य नाही. गुरुतत्त्व आपल्याकडून सर्व करवून घेते.’ नंतर मी ४ ओळींचे ‘जो गुरुकृपा करे…’ हे पद आणि ‘मालकंस’ रागाची एक बंदीश म्हटली. सराव झाल्यावर मला हलकेपणा आणि सकारात्मक वाटले.

३ इ. गायनाचा सराव करतांना दोन्ही हातांची आपोआप ध्यानमुद्रा होणे आणि अनाहतचक्राच्या ठिकाणी संवेदना जाणवणे : एकदा सराव करतांना माझा ‘सा’ हा स्वर नीट लागत नव्हता. त्यामुळे मला ‘गायनाचा सराव करावा’, असे वाटत नव्हते; पण मी नेहमीप्रमाणे अलंकार, एक राग आणि एक भक्तीगीत म्हणत असतांना माझ्या दोन्ही हातांची ध्यानमुद्रा (टीप ३) झाली. ‘ती मुद्रा कशी झाली ?’, ते मला कळलेच नाही. ‘ती मुद्रा सोडू नये’, असे मला वाटत होते. त्या वेळी मला माझ्या अनाहतचक्राच्या ठिकाणी संवेदना जाणवल्या. दुसर्‍या दिवशी सराव करत असतांना पुन्हा माझ्या दोन्ही हातांची ध्यानमुद्रा झाली. त्या दिवशी मी २० मिनिटेच सराव केला आणि मला चांगले वाटले.

विविध गायकांनी गायलेले राग ऐकतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘गायनाचा सराव करतांना मी ‘वेगवेगळ्या गायकांनी गायलेले राग ऐकून काय जाणवते ?’, याचा अभ्यास केला. त्या वेळी मला पुढील सूत्रे जाणवली.

– सौ. भक्ती कुलकर्णी, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२३.९.२०२१)

टीप १ – बंदीश म्हणजे शास्त्रीय गायनातील रागाचे स्वरूप स्पष्ट करणारे बोलगीत. यालाच ‘छोटा ख्याल’, ‘बंदीश’ किंवा ‘चीज’, असेही म्हणतात. ही मध्यलय किंवा द्रुतलय यांत गातात.
टीप २ – विशिष्ट क्रमाने केलेल्या स्वररचनेस ‘अलंकार’ किंवा ‘पलटा’, असे म्हणतात.
टीप ३ – तर्जनी आणि अंगठा या बोटांची टोके एकमेकांना जुळवल्यावर ‘ध्यानमुद्रा’ होते.’

• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक