बिहार सरकार मठ आणि मंदिरे यांची ३० सहस्र एकर भूमी ‘सार्वजनिक मालमत्ता’ म्हणून घोषित करणार !

  • भूमी सरकारच्या नियंत्रणात रहाणार

  • भूमीवरील अतिक्रमणे आणि त्यांची विक्री रोखण्याचा प्रयत्न असल्याचा सरकारचा दावा

  • पुजार्‍यांच्या संघटनेचा विरोध

  • देशात, तसेच बिहार राज्यात वक्फ बोर्डाचीही सहस्रो एकर भूमी असून त्यांवरही अतिक्रमणे झाली आहेत. मग ती भूमी सरकार सार्वजनिक मालमत्ता घोषित करण्याचे धाडस का दाखवत नाही कि सरकारला कोपर्‍याने खणता येते; म्हणून हिंदूंचे मठ आणि मंदिरे यांच्या भूमीवर त्याचा डोळा आहे ? – संपादक
  • बिहारमध्ये संयुक्त जनता दल आणि भाजप यांचे युती सरकार असतांना हिंदूंच्या मंदिरांची भूमी अशा प्रकारे सरकारच्या कह्यात घेतली जाणे हिंदूंना अपेक्षित नाही ! – संपादक
  • उत्तराखंड सरकारने चारधामसह ५१ मंदिरांचे सरकारकरण पुजार्‍यांच्या विरोधामुळे रहित केले. हे पहाता बिहार सरकारने हा निर्णय, तसेच सार्वजनिक मंदिरांवर लादण्यात येणारा ४ टक्के कराचा नियमही रहित केला पाहिजे ! – संपादक
  • भूमी सरकारच्या कह्यात असल्यावर त्यावर अतिक्रमण होणार नाही, तसेच त्यांची विक्री होणार नाही, याची निश्‍चिती बिहार सरकार देणार आहे का ? महाराष्ट्रात पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या कह्यात मंदिरे आणि त्यांची भूमी असतांना त्यांवर अतिक्रमणे झाली, तसेच त्यांचीही विक्री झाली, हे एक जिवंत उदाहारण आहे, हे बिहार सरकार लक्षात घेणार का ? – संपादक
  • अतिक्रमण करणार्‍यांवर कारवाईविषयी सरकार चकार शब्दही काढत नाही, हे लक्षात घ्या ! अतिक्रमण करणार्‍यांवर कारवाई न करता ज्या भूमीवर अतिक्रमण झाले आहे, ती भूमीच कह्यात घेणे, म्हणजे हे एक प्रकारे शासनपुरस्कृत अतिक्रमण नव्हे का ? बिहार सरकारचे हे पाऊल म्हणजे ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ याप्रमाणे आहे ! – संपादक
उजवीकडे राज्याचे कायदा मंत्री प्रमोद कुमार

पाटलीपुत्र (बिहार) – ‘बिहार राज्य धार्मिक न्यास मंडळा’कडे नोंदणीकृत किंवा संलग्न असलेले मठ आणि मंदिरे यांंची ३० सहस्र एकर भूमी ‘सार्वजनिक मालमत्ता’ म्हणून घोषित करण्याचा निर्णय बिहार सरकारने नुकताच घेतला. हा निर्णय मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची चेतावणी पुजार्‍यांच्या संघटनेने दिली आहे. सध्या राज्यातील सहस्रो मठ आणि मंदिरे यांपैकी ४ सहस्र २०० मंदिरे राज्याच्या ‘धार्मिक न्यास मंडळा’कडे नोंदणीकृत असल्याचे समजते.

राज्याचे कायदा मंत्री प्रमोद कुमार म्हणाले,

१. या भूमींवर होणारे अतिक्रमण आणि त्यांची विक्री रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. ‘धार्मिक न्यास मंडळा’ला माहिती मिळाली की, ३६ जिल्ह्यांतील मठ आणि मंदिरे यांच्याकडे ३० सहस्र एकरपेक्षा अधिक भूमी आहे. या भूमीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. काही प्रकरणांत मठ आणि मंदिरे यांच्या भूमी आधीच विकण्यात आल्या आहेत.

२. भोळ्या खरेदीदारांची फसवणूक झाल्याची अनेक प्रकरणे आहेत, ज्यांना हे ठाऊक नाही की मठ आणि मंदिरे यांची भूमी कोणत्याही व्यक्तीला विकता येत नाही. जेव्हा खरेदीदारांना हे कळते, तोपर्यंत विक्रेते फरार झालेले असतात. त्यासाठीच आम्ही हे स्पष्ट केले आहे की, मठ आणि मंदिरे यांची भूमी या देवतेच्या मालकीच्या असून त्यांची भूमी या सार्वजनिक भूमी घोषित केली जावी. अशा भूमीच्या खरेदी-विक्रीचा कोणताही व्यवहार अवैध आहे. यासह अन्य सर्व मठ आणि मंदिरे यांना ‘धार्मिक न्यास मंडळा’च्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न आहे.

मठ आणि मंदिरे यांच्या भूमींच्या व्यवस्थापनाचे दायित्व पुजार्‍यांकडे द्या ! – पुजार्‍यांच्या संघटनेची मागणी

पुजार्‍यांच्या संघटनेची मागणी आहे की, देवस्थानांच्या भूमीवर सरकारी नियंत्रण आम्हाला मान्य नाही. मठ आणि मंदिरे यांची भूमी ‘सार्वजनिक भूमी’ म्हणून घोषित करण्याचा निर्णय योग्य नाही. त्यांचे व्यवस्थापन देवस्थानांच्या पुजार्‍यांकडे दिले पाहिजे.