मुंबई – कोरोना विषाणूच्या ‘ओमिक्रॉन’ या नवीन प्रकारामुळे राज्यात सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करणार्यांनी लसीचे दोन डोस घेतलेले असणे बंधनकारक करण्यात आले आहे. आता हा नियम ‘बेस्ट’ बसमधून प्रवास करणार्यांनाही लागू करण्यात आला आहे. राज्य सरकारने ओमिक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी नवी नियमावली घोषित केली आहे. यामध्ये मुंबईच्या लोकल गाड्यांप्रमाणेच राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्या, टॅक्सी, रिक्शा यांमधून प्रवास करतांना लसीचे दोन डोस घेतले असतील, तरच प्रवास करण्याची अनुमती दिली आहे. रिक्शा आणि टॅक्सी यांत बसलेल्या प्रवाशांनी मुखपट्टी (मास्क) न वापरल्यास प्रवाशाला ५०० रुपये आणि रिक्शा-टॅक्सी चालकालाही ५०० रुपये दंड आकारला जाणार आहे.
दुकानात आलेल्या ग्राहकाने मुखपट्टी लावली नसेल, तर ग्राहकाकडून ५०० रुपये, तर संबंधित दुकानदाराकडून १० सहस्र रुपये दंड आकारला जाणार आहे. मॉल्समध्ये ग्राहकाने मुखपट्टी लावली नसेल, तर मॉल्सच्या मालकाला ५० सहस्र रुपयांचा दंड लावण्यात येणार आहे.