शिरवळ (सातारा) येथे पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या दोघांवर गुन्हा नोंद !

सातारा, २९ नोव्हेंबर (वार्ता.) – शिरवळ (जिल्हा सातारा) येथील शिर्के पेपर मिलजवळ २ जण पिस्तूल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून देवदत्त कांबळे आणि सौरभ नवले या दोघांना कह्यात घेतले. त्यांची पडताळणी केली असता देशी बनावटीचे एक पिस्तूल, ३ भ्रमणभाष, १ दुचाकी असा १ लाख २५ सहस्र ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी कह्यात घेतला आहे. (पिस्तूल विक्रीसाठी २ जण येतात म्हणजे त्यांचा व्यवसायच आहे, हे लक्षात येते. पोलिसांनी याची पाळेमुळे खणून काढणे आवश्यक आहे. – संपादक)

जिल्ह्यात नगरपंचायत निवडणुका होऊ घातल्या असून आचारसंहिता लागू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सातारा पोलिसांकडून काळजी घेण्यात येत आहे. काही संशयास्पद गोष्टी आढळून आल्यास नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन सातारा पोलिसांनी केले आहे.