स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशीची मागणी
सावंतवाडी – तालुक्यातील आंबोली परिसरातील एका हॉटेलमध्ये मेजवानी (पार्टी) चालू असतांना पोलिसांनी नुकतीच धाड टाकून ३४ जणांच्या विरोधात कारवाई केली होती. ही ‘रेव्ह पार्टी’च होती. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या संस्कृतीला असे पर्यटन बाधक असून अशा मेजवान्यांवर निर्बंध आणले पाहिजेत. या प्रकरणाची स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मनसेचे नेते माजी आमदार परशुराम उपरकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.
आंबोली परिसरातील एका हॉटेलवर २२ नोव्हेंबरला पोलिसांनी धाड टाकून १८ युवक आणि १० युवती यांच्यासह ३४ जणांवर कारवाई केली होती. याविषयी माजी आमदार उपरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन मनसेची भूमिका स्पष्ट केली. या पत्रकार परिषदेला मनसेचे शहराध्यक्ष आशिष सुभेदार, जिल्हा कार्याध्यक्ष संतोष भैरवकर, अभय देसाई आदी उपस्थित होते.
या वेळी माजी आमदार उपरकर म्हणाले, ‘‘सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणारे सगळेच पर्यटक मद्य पिण्यासाठी येत नाहीत, तर येथील संस्कृती पहाण्यासाठीही येतात. त्यामुळे येथील संस्कृतीला बाधा न आणणारा पर्यटन विकास आवश्यक आहे. आंबोली परिसरातील हॉटेलवर पोलिसांनी केलेली कारवाई योग्य होती. त्या मेजवानीत अमली पदार्थांचे सेवन झाल्याची माहिती मिळाली असून त्याविषयी पोलिसांनी चौकशी करावी. आंबोली, चौकुळ या परिसरात गेली ३-४ वर्षे अशा मेजवान्या सातत्याने होत आहेत, हे योग्य नाही. येथे मेजवानी झालेल्या हॉटेल मालकाकडे आवश्यक अनुमती घेतल्या होत्या का ? याची चौकशी करावी, अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याकडे करणार आहे. जिल्ह्यात होणार्या अशा प्रकारांचे आम्ही समर्थन करणार नाही.’’