चीनची लडाख सीमेवर महामार्ग बांधणी चालू !

मोठ्या प्रमाणात सैन्यही तैनात

भारताने सीमेजवळ बांधकाम केल्यास चीन भारतामुळे सीमेवर तणाव निर्माण होत असल्याचा कांगावा करतो, मग चीन असे बांधकाम करत असतांना भारत गप्प का बसतो ? – संपादक

प्रतिकात्मक छायाचित्र

लेह (लडाख) – चीनने लडाख सीमेवर नवीन महामार्ग आणि रस्ते बांधणे चालू केले आहे. यासह पूर्व लडाखजवळ क्षेपणास्त्र तैनात करण्यास प्रारंभ केला आहे. भारत आणि चीन यांच्यात नुकत्याच झालेल्या चर्चेत भारताने सीमेवर चीनच्या बांधकामाविषयी चिंता व्यक्त केली होती.

१. चिनी सैन्याने पूर्व लडाख सेक्टरच्या समोर असलेल्या अक्साई चीन भागात नवीन महामार्ग बांधणे चालू केले आहे. यामुळे चिनी सैन्याचा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपर्यंत पोचण्याचा वेळ पूर्वीच्या तुलनेत अल्प होणार आहे.

२. पाळत ठेवण्यासाठी ड्रोनदेखील वाढवण्यात आले आहेत. चीन काशगर, गर गुंसा आणि होटन येथील मुख्य तळांव्यतिरिक्त महामार्गांचे रुंदीकरण अन् नवीन हवाई धावपट्ट्या बांधत आहे.

३. तिबेटी लोकांची भरती करून त्यांना मुख्य भूभागावरील हान सैन्यासह सीमा चौक्यांवर बसवण्यात येत आहे. चीनला ‘भूमीपुत्र’ तिबेटींचा उपयोग करून कठीण भूभागाचा वापर करायचा आहे, जेथे त्यांच्या सैन्याला जगणेही कठीण आहे.