कोल्हापूर, २६ नोव्हेंबर (वार्ता.) – वर्ष २०१९ आणि वर्ष २०२१ मध्ये अतीवृष्टीमुळे कागल तालुक्यातील मौजे आनुर येथील ग्रामस्थांच्या घराची मोठ्या प्रमाणात हानी झाली. त्यामुळे आता हे पूरप्रवण क्षेत्र झाले आहे. शासन पूरग्रस्त परिसरातील लोकांना स्थलांतर करायला सांगते. येथील ग्रामस्थांनी येथे पक्की घरी बांधली असून ती सोडून आता अन्य ठिकाणी स्थलांतरित होणे त्यांना शक्य नाही. येथील अनेक ग्रामस्थ हे कुंभार आणि बारा बलुतेदार समाजातील असून मोठ्या आर्थिक अडचणींमधून त्यांनी घरे बांधली आहेत. त्यामुळे आनूर (जिल्हा कोल्हापूर) येथील ग्रामस्थांची पावसाळ्यातील ४ मास तात्पुरती निवार्याची सोय करावी, या मागणीचे निवेदन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा प्रशासनास देण्यात आले. जिल्हाधिकार्यांच्या वतीने हे निवेदन तहसीलदार संतोष कणसे यांनी स्वीकारले.
या वेळी रामा कुंभार, बाळासो कुंभार, भीमराव गायकवाड, महादेव गायकवाड, राजेंद्र कुंभार, आनंदा कुंभार यांसह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.