पृथ्वीच्या दिशेने येणार्‍या लघुग्रहाची दिशा आणि गती पालटण्यासाठी ‘नासा’ त्याच्यावर यान आदळवणार !

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ पृथ्वीच्या सुरक्षेच्या दृष्टीने १ डिसेंबर या दिवशी ‘डार्ट’  (डबल अ‍ॅस्ट्रॉईड रिडायरेक्शन टेस्ट) यान प्रक्षेपित करणार आहे. हे यान दोन लघुग्रहांचा समूह असलेल्या ‘डिडिमोस’वर (म्हणजेच त्याच्याभोवती फिरणार्‍या ‘डिमोर्फस’वर) आदळवले जाईल. यामुळे लघुग्रहाची दिशा आणि गती पालटते का ? हे पाहिले जाणार आहे. भविष्यात पृथ्वीच्या दिशेने येणार्‍या धोकादायक लघुग्रहांची धडक टाळण्यासाठी त्यांची दिशा पालटता येते का ? हेही याद्वारे पाहिले जाणार आहे. ‘नासा’ने या मोहिमेला ‘डार्ट’असे नाव दिले आहे. या मोहिमेसाठी अनुमाने २ सहस्र कोटी रुपयांचा व्यय येणार आहे. विशेष म्हणजे वर्ष २००३ मध्ये डिडिमोस हा लघुग्रह पृथ्वीजवळून गेला होता आणि वर्ष २०२२ मध्ये तो पुन्हा पृथ्वीजवळून जाणार आहे.

‘डिडिमोस’ हा दोन लघुग्रहांचा लघुग्रह आहे. त्यातील मोठा ग्रह अनुमाने ७८० मीटर आकाराचा असून त्यालाच ‘डिडिमोस’ म्हटले जाते, तर लहान ग्रह अनुमाने १६० मीटरचा असून त्याला ‘डिमोर्फस’ असे म्हटले जाते. हा डिमोर्फस एखाद्या चंद्राप्रमाणे डिडिमोसभोवती प्रदक्षिणा घालतो. केवळ संशोधनासाठी, निरीक्षणासाठी त्याच्यावर यानाची ही धडक घडवून आणली जाणार आहे.