कोट्यवधी रुपये खर्च करूनही शिवसेनेने मालवण शहर बकाल केले ! – सुदेश आचरेकर, माजी नगराध्यक्ष, भाजप

घनकचरा व्यवस्थापन मोहिमेत मालवण नगरपरिषदेचा क्रमांक घसरल्याने टीका

सुदेश आचरेकर, माजी नगराध्यक्ष, भाजप

मालवण – वर्ष २०११ ते २०१५ या कालावधीत ३ वेळा राज्यस्तरावर, २ वेळा विभागीय स्तरावर उल्लेखनीय यश मिळवणार्‍या मालवण नगरपरिषदेचा नावलौकिक शिवसेनेने धुळीस मिळवला आहे. वर्ष २०१६ मध्ये ही नगरपरिषद शिवसेनेच्या कह्यात गेल्यानंतर नगरपरिषदेने घनकचरा व्यवस्थापनासाठी ३ कोटी १० लाख ७४ सहस्र ४८८ रुपये खर्च केला; मात्र तरीही केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’ अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनात मालवण नगरपरिषदेचा क्रमांक घसरला. याचा अर्थ शिवसेनेने संपूर्ण शहर बकाल केले असून त्याचा प्रत्यय या अभियानाच्या निकालातून आल्याची टीका माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी केली.

येथील कोणार्क रेसिडेन्सी येथील भाजपच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत आचरेकर बोलत होते. या वेळी भाजपचे प्रभारी शहर मंडल अध्यक्ष विजय केनवडेकर, नगरसेवक दीपक पाटकर, गणेश कुशे, जगदीश गावकर आदी उपस्थित होते.

या वेळी आचरेकर पुढे म्हणाले, ‘‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’ अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनात मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटक या ४ राज्यांच्या विभागात मालवण नगरपरिषद १३४ व्या स्थानावर गेली. यामध्ये वेंगुर्ला नगरपरिषद १७ व्या, सावंतवाडी नगरपरिषद ३२ व्या, तर कणकवली नगरपंचायत ६७ व्या स्थानावर आहेत. शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी गेल्या ५ वर्षांत भूमीपूजन करून प्रारंभ केलेले शहरातील एकही काम पूर्ण का होऊ शकले नाही ? शहरातील कचरा टाकण्यात येणार्‍या मैदानात जाऊन आमदार नाईक यांनी तेथील परिस्थिती पहावी. मालवण नगरपरिषदेत आमची सत्ता होती, तेव्हा वर्ष वर्ष २०११ ते २०१५ या कालावधीत घनकचरा व्यवस्थापनावर १ कोटी १३ लाख ४४ सहस्र रुपये खर्च करण्यात आले. या कालावधीत नगरपरिषदेने ३ वेळा राज्यस्तरावर, तर २ वेळा विभागस्तरावर यश मिळवले होते. मग आताच्या शिवसेनेच्या सत्ताधार्‍यांनी ३ कोटी रुपये खर्च करूनही नगरपरिषदेचा क्रमांक घनकचरा व्यवस्थापन मोहिमेत का घसरला ?’’