तुम्हाला रस्त्यांची दुर्दशा पाहून लाज वाटत नाही का ?

  • केरळमधील रस्त्यांच्या दुर्दशेवरून केरळ उच्च न्यायालयाने अधिकार्‍यांना फटकारले !

  • देखभाल करण्याचे ठाऊक नसेल, तर अभियंत्यांनी त्यागपत्र द्यावे ! – उच्च न्यायालय

  • न्यायालयाने अशांना फटकारण्यासह कठोर शिक्षा करावी, जेणेकरून भविष्यात तरी असे कुणाकडून होणार नाही ! – संपादक
  • केरळमधील साम्यवादी माकपचे सरकार आंधळे आहे का ? त्यांना रस्त्यांची झालेली दयनीय स्थिती दिसत नाही का ? – संपादक
प्रातिनिधिक छायाचित्र

थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळ राज्यात मुसळधार पावसामुळे रस्त्यांची स्थिती दयनीय झाली आहे. यावरून केरळ उच्च न्यायालयाने संबंधित अधिकार्‍यांना कठेर शब्दांत फटकारले आहे. ‘कुणालातरी दुखापत झाल्यावर किंवा कुणी मेल्यावरच तुम्ही काम करणार का ? तुम्हाला रस्त्यांची दुर्दशा लाज वाटत नाही का ? कारण मला हे सगळे सांगतांनाच लाज वाटत आहे. कधीपर्यंत हे असेच चालत रहाणार ? ‘रस्त्यांची देखभाल कशी करावी’, हे जर अभियंत्यांना ठाऊक नसेल, तर त्यांनी त्यागपत्र द्यावे’, अशा शब्दांत न्यायालयाने संबंधित अधिकार्‍यांना फटकारले. ‘न्यायालयाच्या सूचनांकडे संपूर्ण दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती ओढावली’, असेही न्यायालयाने सुनावले.

न्यायालयाने म्हटले की,

१. नेहमीप्रमाणे पावसाळ्यानंतर न्यायालयाकडे रस्त्यांविषयीच्या तक्रारी येण्यास प्रारंभ  झाला आहे. हे फारच दुःखदायक आहे की, १८ ऑक्टोबर २०१९ या दिवशी न्यायालयाने याविषयी अगदी नेमक्या शब्दांत सूचना दिलेल्या होत्या; मात्र त्यांच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष झालेले दिसत आहे. तथापि न्यायालय त्यांना इतक्या सहज या सूचना विसरू देणार नाही आणि जर ते विसरले असतील, तर त्यांना त्यांच्या वैधानिक अन् घटनात्मक कर्तव्यांची जाणीव करून देण्यासाठी आम्ही आवश्यक ती कारवाई करू.

२. संबंधित विभागाकडे जर कौशल्यपूर्ण अभियंत्यांची कमतरता असेल, तर बाहेर अनेक उच्चशिक्षित लोक आहेत, त्यांना संधी द्या.

३. प्रतीवर्षी रस्ता थोडाथोडा खराब होत होता. त्याकडे अधिकार्‍यांनी संपूर्ण दुर्लक्ष कसे काय केले ? जर तुम्ही रस्त्याकडे लक्ष ठेवून होता, तर तुम्हाला कळले ‘रस्ता कधी खराब झाला आहे ?’, हे कळले कसे नाही. स्वतः त्या रस्त्यावरून जातांनासुद्धा तुम्हाला लक्षात आले नाही का ?