(म्हणे) ‘भारतीय अधिकार्‍यांच्या विधानांमुळे सीमेवर तणाव वाढू शकतो !’ – चीनचा थयथयाट

सीडीएस् जनरल रावत यांच्या ‘भारताला सर्वाधिक धोका चीनचा’ या विधानावर चीनची प्रतिक्रिया

सीडीएस् जनरल बिपिन रावत यांनी काही चुकीचे सांगितलेले नाही; मात्र चीनला मिरच्या झोंबल्यामुळे तो थयथयाट करत आहे. यापेक्षा चीनने सीमेवरील कुरापती बंद कराव्यात आणि अक्साई चीन भारताला परत द्यावा ! – संपादक

डावीकडे ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ (सीडीएस्) जनरल बिपिन रावत

बीजिंग (चीन) – भारताचे अधिकारी विनाकारण चीनकडून सैनिकी धोक्याविषयी शक्यता वर्तवत आहेत. अशी विधाने दायित्वशून्यतेची आहेत. भारत आणि चीन सीमेविषयीच्या सूत्रावर चीनचे धोरण स्पष्ट आहे. तसेच सीमेवर शांतता ठेवण्याविषयी चीन कटीबद्ध आहे; मात्र अशा प्रकारच्या विधानांमुळे तणाव वाढू शकतो, असे विधान चीनकडून भारताचे ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ (सीडीएस्) जनरल बिपिन रावत यांच्या विधानावर करण्यात आले आहे. बिपिन रावत यांनी म्हटले होते की, भारताला सर्वाधिक धोका चीनकडून आहे. भारत आणि चीन यांच्यातील सीमावाद सोडवण्यासाठी विश्‍वासाची कमतरता आहे अन् त्यामुळे संशय वाढत आहे.

चीनचे ज्येष्ठ कर्नल वू कियान

चीनचे ज्येष्ठ कर्नल वू कियान यांनी म्हटले की, रावत यांच्या विधानाचा आम्ही विरोध करत आहोत. सीमावादाविषयी भारताला त्याचा पक्ष ठेवण्यासाठी आम्ही संधी दिलेली आहे. सीमेविषयी चीनचे स्पष्ट धोरण आहे. चीन देशाच्या सुरक्षा आणि सार्वभौमत्व यांच्याशी कोणतीही तडजोड करू शकत नाही. तरीही आम्ही सीमेवरील तणाव न्यून करण्याचा प्रयत्न करत आहोत.