शक्ती मिल येथील सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींची फाशी रहित; जन्मठेपेची शिक्षा !

भारतात प्रचंड प्रमाणात बलात्कार होण्यामागील एक मुख्य कारण आरोपींना शिक्षा न होणे किंवा कठोर शिक्षा न होणे हेच आहे ! – संपादक 

शक्ती मिल

मुंबई – येथील शक्ती मिलमध्ये एका मुलीवर सामूहिक बलात्कार करणार्‍या सर्व आरोपींची फाशीची शिक्षा रहित करून या शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेच्या शिक्षेत करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. कासीम बंगाली, सलिम अंसारी, विजय जाधव अशी या आरोपींची नावे आहेत.

वर्ष २०१३ मध्ये ही घटना घडल्यानंतर मुंबई सत्र न्यायालयाने डिसेंबर २०१४ मध्ये या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. याला आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. घटना घडली तेव्हा लोकांचा रोष अधिक होता; परंतु कायद्याचा विचार करता, हे प्रकरण फाशीचे नाही, असे न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा देतांना नमूद केले आहे.

न्यायालयाने सुनावणीत म्हटले की, या घटनेने समाजाला पुष्कळ मोठा धक्का दिला. बलात्काराची प्रत्येक घटना ही पुष्कळ मोठा गुन्हा आहे. यामुळे केवळ शारीरिक नाही, तर मानसिक आरोग्याला हानी पोचते. पीडितेच्या सन्मानावर हे आक्रमण असते. पण घटनेवर चालणारे न्यायालय लोकांच्या मतांच्या आधारे शिक्षा ठरवू शकत नाही. नियमाप्रमाणे जन्मठेपेची शिक्षा असून, फाशी हा एक अपवाद आहे. त्यामुळे योग्य विचार करून निर्णय घेतला पाहिजे. अशा घटनांमध्ये प्रक्रिया विसरून चालणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

‘महिलांकडे एक वस्तू म्हणून पहाणारे हे आरोपी नैसर्गिक मृत्यू होईपर्यंत जन्मठेपेच्या शिक्षेस पात्र आहेत’, असे न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले. आरोपी पॅरोल किंवा फर्लोसाठी अर्ज करू शकत नाहीत, असेही नमूद केले आहे. मुंबईतील शक्ती मिल कंपाऊंडमध्ये २२ ऑगस्ट २०१३ ला एका मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. छायाचित्रकार असणारी ही तरुणी आपल्या सहकार्‍यासह या ठिकाणी छायाचित्र काढण्यासाठी गेली होती. या वेळी पाच जणांनी तिच्यावर बलात्कार केला होता.