एस्.टी. कर्मचार्‍यांच्या मूळ वेतनात वाढ करण्याचा निर्णय !

  • परिवहनमंत्री अनिल परब यांची घोषणा !

  • वेतनवाढ म्हणजे फसवणूक असल्याचा कर्मचार्‍यांचा आरोप

मुंबई – एस्.टी.च्या विलीनीकरणासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत कर्मचार्‍यांना वेतनात अंतरिम वाढ देण्याचा प्रस्ताव सरकारने दिला आहे. या कर्मचार्‍यांच्या मूळ वेतनात वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या प्रस्तावाला राज्य शासनाने मान्यता दिली असून ज्यांचे वेतन १२ सहस्र ५०० रुपये आहे, त्यांना १७ सहस्र ५०० रुपये वेतन मिळणार आहे, अशी माहिती राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी २४ नोव्हेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. ‘कर्मचार्‍यांची नवी वेतनवाढ नोव्हेंबरपासून चालू होणार आहे. हे वेतन १० तारखेच्या आतच दिले जाईल. ‘कर्मचारी त्वरित कामावर उपस्थित झाल्यास त्यांचे निलंबन रहित होईल’, असेही त्यांनी सांगितले. अनिल परब यांनी या वेळी कर्मचार्‍यांना कामावर उपस्थित रहाण्याचे आवाहन केले.

आंदोलनाचे नेतृत्व करणारे गोपीचंद पडळकर म्हणाले, ‘‘जोपर्यंत विलीनीकरण होणार नाही, तोपर्यंत ठोस निर्णय घेणार नाही. आम्ही कर्मचार्‍यांच्या भूमिकेसमवेत आहोत.’’ आमदार सदाभाऊ खोत म्हणाले, ‘‘आम्हीही कर्मचार्‍यांच्या बाजूने आहोत.’’

‘वेतनवाढ म्हणजे फसवणूक’ असा आरोप कर्मचार्‍यांनी केला असून एस्.टी.चे कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवरच ठाम आहेत. वेतनवाढीचा प्रस्ताव कर्मचार्‍यांना मान्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.