संभाजीनगर – शिवसेनेचे नेते आणि माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जालना येथील रामनगर सहकारी साखर कारखानाच्या खरेदीत ९४० कोटी रुपयांचा अपव्यवहार केला आहे, असा दावा करून या प्रकरणी अंमलबजावणी संचनालयाकडून (‘ईडी’कडून) चौकशी चालू आहे’, अशी माहिती भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी १९ नोव्हेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. ‘या कारखान्याची ९४० कोटी रुपये किमतीची १०० एकर भूमीही लाटण्याचा खोतकरांचा प्रयत्न चालू आहे’, असेही ते म्हणाले.
खोतकरांचा १०० कोटींचा घोटाळा; सोमय्यांचा आरोप, ‘ते’ २३ मंत्री-नेते कोण?#arjunkhotkar @KiritSomaiya @BJP4Maharashtra #ShivSena #maharashtragovernment https://t.co/EbkTCEs6aP
— Maharashtra Times (@mataonline) November 19, 2021
किरीट सोमय्या पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर रामनगर सहकारी साखर कारखानाच्या अपहाराविषयी आलेल्या अनेक तक्रारी दाबण्यात आल्या आहेत. या कारखान्यासाठी जालना जिल्ह्यातील शेतकर्यांनी १३५ एकर भूमी नाममात्र दरात दिली होती. या प्रत्येक शेतकर्याला २ सहस्र रुपयांचा १ शेअर देण्यात आला होता. एकूण ९ सहस्र शेअरधारक आहेत. या कारखान्याकडे वर्ष २००७ अखेर राज्य सहकारी बँकेची ११ कोटी ४२ लाख रुपयांची थकबाकी होती. त्यामुळे बँकेने कारखान्याचा लिलाव करण्याचे ठरवले होते. फेब्रुवारी २०१२ मध्ये निविदा काढण्यात आली. या कारखान्याच्या नुसत्या भूमीच्या रेडीरेकनरची किंमत तेव्हा ७० कोटी रुपये होती; मात्र तडजोड करून संपूर्ण कारखान्याची भूमी, यंत्रे आणि इतर मालमत्ता यांची किंमत ४२ कोटी रुपये ठेवण्यात आली. महाराष्ट्र सरकारची १०० एकर भूमी बँकेकडे गहाण नसतांनाही विकण्यासाठी काढली.
अर्जुन खोतकर यांनी आरोप फेटाळले
अर्जुन खोतकर यांनी किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले की, रामनगर साखर कारखान्याचा मी मालक नाही. त्यात माझे फक्त ७० लाख रुपयांचे कारखान्याचे भाग (शेअर्स) आहेत. १०० कोटी आणि १ सहस्र कोटी रुपयांच्या आरोपात काहीच तथ्य नाही. कारखान्याच्या मालकांशी मी बोलतो आणि भूमीसह १०० कोटी रुपयांमध्ये सोमय्या यांना हा कारखाना देतो. ऊठसूट आरोप करायचे एवढेच त्यांचे काम आहे आणि त्यासाठीच भाजपने त्यांना ठेवले आहे.