बुलढाणा – गेल्या काही दिवसांपासून एस्.टी. कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीसाठी संपावर गेले आहेत. आमचे सरकार होते, तेव्हाही हा प्रश्न निर्माण झाला होता, त्या वेळी एस्.टी.चे शासनात विलीनीकरण झाले नव्हते, असे प्रतिपादन भाजपचे नेते महादेव जानकर यांनी २१ नोव्हेंबर या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना केले. जानकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांची येथील शासकीय रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली.
महादेव जानकर पुढे म्हणाले की, रस्त्यावर असतांना एक बोलावे लागते आणि आत गेल्यावर एक असते. त्यामुळे हा पद्धतीचा भाग आहे. त्यामुळे जनतेने हुशार झाले पाहिजे, हाच त्यावरचा एक पर्याय आहे. भाजप सरकारच्या काळातही एस्.टी.च्या विलीनीकरणाचे सूत्र उपस्थित झाले होते, तेव्हा ते झाले नाही.