ईश्वरपूर (जि. सांगली) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) शालन राजाराम नरुटे (वय ७६ वर्षे) यांच्या आध्यात्मिक प्रवासाविषयी त्यांचे सुपुत्र ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शंकर नरुटे यांना जाणवलेली सूत्रे !
‘२१.३.२०२० या दिवशी माझ्या आईचे निधन झाले. माझ्या आईला देवाची फारशी आवड नव्हती, तरीही भगवंताने तिची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित करून तिला जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त केले. याचा कार्यकारणभाव माझ्या नंतर लक्षात आला.
१. मुलाला सेवा करण्याची अनुमती देणे
मी सनातन संस्थेत आल्यापासून तिची सेवेला जाण्यासाठी नेहमी अनुमती असायची. वर्ष २००२ पासून मी पूर्णवेळ साधना करू लागलो. तेव्हापासून घरी अनेक अडचणी आल्या; पण भगवंताने त्या अलगद सोडवल्या.
२. आईला कर्करोग झाल्यावर तिच्या उपचारांसाठी आईच्या समवेत मिरज आश्रमात रहाणे आणि आश्रमातील चैतन्यामुळे आई नामजपादी उपाय करू लागणे अन् आश्रमातील चैतन्यामुळे आईत पालट होणे
वर्ष २०१९ मध्ये आईला कर्करोग झाला होता. तेव्हा मी तिला उपचारांसाठी मिरज येथे घेऊन जात होतो. त्या वेळी तिला मिरज आश्रमात रहाता आले. मी आश्रमात राहून करत असलेल्या सेवा पाहून, तसेच आश्रमजीवन आणि साधकांमधील प्रेमभाव तिने अनुभवला. आश्रमातील चैतन्यामुळे आई नामजपादी उपायही करू लागली होती. त्यामुळे तिच्यात पालट होऊ लागला.
३. सद्गुरु आणि संत यांची आईवर असलेली कृपा !
३ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आईच्या प्रकृतीची विचारपूस करणे : मी सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात गेल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले नेहमी आईची आठवण काढून तिच्या प्रकृतीची आवर्जून विचारपूस करायचे. या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले माझी आणि माझ्या कुटुंबियांची सर्वतोपरी काळजी घेत असल्याचे मी अनुभवले.
३ आ. देवद आश्रमातील परात्पर गुरु पांडे महाराज यांना ‘आई रुग्णाईत आहे’, असे सांगितल्यावर त्यांनीही तिची विचारपूस केली आणि आधार दिला. त्यांनी आईसाठी मंत्रजपही दिले होते.
३ इ. आईच्या अंतिम समयी आईची साधना चांगली होण्यासाठी आणि अडथळे दूर होण्यासाठी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी विविध उपाय सांगणे : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ नेहमी आईची विचारपूस करत होत्या. ‘घरातील सर्व सदस्यांची साधना होण्यासाठी काय करू शकतो ?’, हेही त्या नेहमी सुचवायच्या. आईच्या अंतिम दिवसांत आईची साधना चांगली होण्यासाठी आणि अडथळे दूर होण्यासाठी त्यांनी विविध उपायही सांगितले. मी घरी असतांना ‘माझी साधना चालू रहाण्यासाठी कसे प्रयत्न करायचे ?’, याविषयी त्यांनी सांगितल्यामुळे मला स्थिर राहून प्रयत्न करता आले.
४. आईला संतांचे आशीर्वाद लाभणे आणि तिची मृत्यूत्तर ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाल्याचे घोषित होऊन जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून तिची सुटका होणे
आईला संतांचे आशीर्वाद लाभल्याने तिची साधना चालू झाली आणि तिला साधना करायला शक्ती मिळाली. आईच्या निधनानंतर तिची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाल्याचे घोषित झाले. तिची जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून सुटका होऊन तिला मोठे फळ मिळाले. तिच्यावर ईश्वराची कृपा झाली. ‘आई-बाबांनी (श्री. राजाराम भाऊ नरुटे) मला साधना करण्यासाठी आश्रमात पाठवले’, हा त्यांचा मोठा त्याग आहे. त्याचे फळ भगवंताने त्यांना दिले.
५. भगवंताची प्रीती
भगवंत प्रत्येकाला त्याने केलेल्या सत्कर्माचे फळ देतोच. ते कधीच वाया जाऊ देत नाही. देव साधना करणार्या व्यक्तीची आध्यात्मिक स्तरावर सर्व काळजी घेतोच. भगवंत साधना करणार्या व्यक्तीची संतांच्या माध्यमातून स्थुलातूनही सर्व प्रकारची काळजी घेत असतो.
६. कृतज्ञता
परात्पर गुरु डॉ. आठवले साधना करणार्या प्रत्येक जिवाची प्रगती करवून घेतात. त्याला आणि त्याच्या कुटुंबियांनाही पुढे नेतात. भगवंत प्रत्येकाचा उद्धार करतो. अशा सर्वव्यापी भगवंताच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) चरणी मी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. शंकर नरुटे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२८.४.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक