कार्तिक मासातील (२२.११.२०२१ ते २७.११.२०२१ या दिवसांतील) शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

‘५.११.२०२१ या दिवसापासून कार्तिक मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

१. हिंदु धर्मानुसार ‘प्लव’नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४३, दक्षिणायन, शरदऋतू, कार्तिक मास आणि कृष्ण पक्ष चालू आहे.

(साभार : दाते पंचांग)

२. शास्त्रार्थ

२ अ. अमृतयोग : नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने ‘अमृतयोग’ किंवा ‘अमृतसिद्धीयोग’ होतो. रविवारी हस्त नक्षत्र, सोमवारी मृग नक्षत्र, मंगळवारी अश्विनी नक्षत्र, बुधवारी अनुराधा नक्षत्र, गुरुवारी पुष्य नक्षत्र, शुक्रवारी रेवती नक्षत्र आणि शनिवारी रोहिणी नक्षत्र असेल, तर ‘अमृतयोग’ किंवा ‘अमृतसिद्धीयोग’ होतो. अमृतयोगावर कोणतेही शुभकार्य केल्यावर यश प्राप्त होते. सोमवार, २२.११.२०२१ या दिवशी सकाळी १०.४३ पर्यंत मृग नक्षत्र असल्याने अमृतयोग आहे.

२ आ. भद्रा (विष्टी करण) : ज्या दिवशी ‘विष्टी’ करण असते, त्या काळालाच ‘भद्रा’ किंवा ‘कल्याणी’ असे म्हणतात. भद्रा काळात शुभ आणि मंगल कार्ये करत नाहीत; कारण त्या कार्यांना विलंब होण्याचा संभव असतो. २२.११.२०२१ या दिवशी सकाळी ९.०८ पासून रात्री १०.२८ पर्यंत आणि २५.११.२०२१ या दिवशी उत्तररात्री ४.४३ पासून २६.११.२०२१ या दिवशी सायंकाळी ५.१८ पर्यंत विष्टी करण आहे.

सौ. प्राजक्ता जोशी

२ इ. अंगारक चतुर्थी : प्रत्येक मासातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला ‘संकष्ट चतुर्थी’ असे म्हणतात. मंगळवारी येणार्‍या चतुर्थी तिथीला ‘अंगारकयोग’ होतो. ज्या दिवशी चंद्रोदयाच्या वेळी चतुर्थी तिथी असते, त्या दिवशी संकष्ट चतुर्थीचा उपवास करतात; कारण श्री गणपतीच्या या व्रतामध्ये चंद्रदर्शन होणे विशेष महत्त्वाचे आहे. २३.११.२०२१ या दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री ९.०५ आहे. या दिवशी श्री गणेश मंत्राचा जप करतात, तसेच अथर्वशीर्ष, श्री गणेश स्तोत्र, श्री गणेश अष्टोत्तरशत नामावली वाचतात. या उपासनेने सर्व कार्ये सिद्ध होतात.

२ ई. घबाड मुहूर्त : हा शुभ मुहूर्त आहे. २३.११.२०२१ या दिवशी दुपारी १.४४ पासून उत्तररात्री १२.५६ पर्यंत घबाड मुहूर्त आहे.

२ उ. दग्धयोग : रविवारी द्वादशी, सोमवारी एकादशी, मंगळवारी पंचमी, बुधवारी तृतीया, गुरुवारी षष्ठी, शुक्रवारी अष्टमी आणि शनिवारी नवमी ही तिथी असेल, तर दग्धयोग होतो. दग्धयोग हा अशुभयोग असल्याने सर्व कार्यांसाठी निषिद्ध मानला आहे.

१. २३.११.२०२१ या दिवशी मंगळवार असून उत्तररात्री १२.५६ नंतर पंचमी तिथी असल्याने दुसर्‍या दिवशी सूर्याेदयापर्यंत ‘दग्धयोग’ आहे.

२. २५.११.२०२१ या दिवशी गुरुवार असून उत्तररात्री ४.४३ पर्यंत षष्ठी तिथी असल्याने ‘दग्धयोग’ आहे.

३. २६.११.२०२१ या दिवशी शुक्रवार असून उत्तररात्री ५.४३ नंतर अष्टमी तिथी असल्याने दुसर्‍या दिवशी सूर्याेदयापर्यंत ‘दग्धयोग’ आहे. (टीप १)

४. २७.११.२०२१ या दिवशी शनिवार असून उत्तररात्री ६.०१ नंतर नवमी तिथी असल्याने दुसर्‍या दिवशी सूर्याेदयापर्यंत ‘दग्धयोग’ आहे. (टीप १)

२ ऊ. यमघंटयोग : रविवारी मघा, सोमवारी विशाखा, मंगळवारी आर्द्रा, बुधवारी मूळ, गुरुवारी कृत्तिका, शुक्रवारी रोहिणी आणि शनिवारी हस्त नक्षत्र एकत्र आल्यास ‘यमघंटयोग’ होतो. हा अनिष्टयोग आहे. प्रवासासाठी हा योग पूर्णतः वर्ज्य करावा. मंगळवारी २३.११.२०२१ या दिवशी दुपारी १.४४ पर्यंत आर्द्रा नक्षत्र असल्याने यमघंटयोग आहे.

२ ए. गुरुपुष्यामृतयोग : गुरुवारी पुष्य नक्षत्र आल्यास ‘गुरुपुष्यामृतयोग’ होतो. २५.११.२०२१ या दिवशी सूर्याेदयापासून सायंकाळी ६.४९ पर्यंत गुरुपुष्यामृतयोग आहे. या दिवशी ‘सुवर्ण खरेदी करणे आणि शुभ कार्ये करणे’, असा प्रघात आहे. सर्व लौकिक किंवा व्यावहारिक कार्यांसाठी हा योग शुभ मानला जातो. साधकांनी ‘गुरुपुष्यामृतयोगा’वर अधिकाधिक साधना करणे आवश्यक आहे. या योगावर ‘प्रज्ञाविवर्धन’ स्तोत्राचे पुरश्चरण केल्यास बुद्धीची वाढ होते.

२ ऐ. मृत्यूयोग : रविवारी अनुराधा, सोमवारी उत्तराषाढा, मंगळवारी शततारका, बुधवारी अश्विनी, गुरुवारी मृग, शुक्रवारी आश्लेषा आणि शनिवारी हस्त नक्षत्र एकत्र आल्यास ‘मृत्यूयोग’ होतो. हा योग प्रयाणास किंवा कोणत्याही शुभ कार्यास वर्ज्य करावा. शुक्रवार, २६.११.२०२१ या दिवशी सूर्याेदयापासून रात्री ८.३६ पर्यंत आश्लेषा नक्षत्र असल्याने ‘मृत्यूयोग’ आहे.

२ ओ. कालभैरव जयंती : प्रदोषकाळी असलेल्या कार्तिक कृष्ण पक्ष अष्टमीला श्री कालभैरव देवतेचा जन्म झाला आहे. कालभैरव ही शैव परिवारातील एक देवता आहे. भैरवाला भगवान शंकराचा अवतार मानले आहे. श्री कालभैरव देवतेला ग्रामदैवत मानले जाते. या दिवशी श्री कालभैरव देवतेचे पूजन करून ‘कालभैरवाष्टक स्तोत्र’ म्हणावे. हे स्तोत्र म्हटल्याने सर्व प्रकारचे भय नाहीसे होते.

टीप १ – ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याेदयानंतर वार पालटतो.

– सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद, वास्तू विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमलशास्त्री आणि हस्ताक्षर मनोविश्लेषणशास्त्र विशारद), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (४.११.२०२१)