|
पुणे – डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी चालू असलेल्या खटल्यात ‘पुणे शहर पोलिसांना साहाय्य करण्यासाठी पंच श्याम मारणे यांनी न्यायालयासमोर चुकीचा जवाब दिला’, असा आरोप बचाव पक्षाच्या अधिवक्त्यांनी १९ नोव्हेंबर या दिवशी पुणे विशेष न्यायालयात केला. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या आरोपपत्राचा संदर्भ घेऊन अधिवक्ता प्रकाश सालसिंगीकर, अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि अधिवक्त्या सुवर्णा आव्हाड वस्त यांनी पंच श्याम मारणे यांची उलटतपासणी घेतली. त्यांनी मारणे यांना सीलबंद वस्तूंविषयी प्रश्न विचारले आणि वरील आरोप केला.
वर्ष २०१४ मध्ये पुणे पोलिसांकडून केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचे अन्वेषण
काढून घेतले होते. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने न्यायालयाला सादर केलेल्या आरोपपत्रात श्याम निवृत्ती मारणे यांच्या नावासहित ‘पंचनाम्याच्या कागदावर २१ ऑगस्ट २०१३ ला स्वाक्षरी केली; पण त्यावर २० ऑगस्ट २०१३ हा दिनांक टाकला होता’, हा जवाब नोंदवला आहे.
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या आरोपपत्रात म्हटले आहे की, मारणे २० ऑगस्ट २०१३ या दिवशी म्हणजे हत्या झाल्याच्या दिवशी घटनास्थळी गेले नव्हते. २१ ऑगस्ट २०१३ म्हणजे दुसर्या दिवशी त्यांना डेक्कन पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. तिथे राहुल चितळे हे दुसरे पंचही उपस्थित होते. पंचनाम्यावर स्वाक्षरी करण्याच्या वेळी पोलिसांनी त्यांना दोन रिकामी आणि दोन भरलेली कारट्रेज, डॉ. दाभोलकर यांचे रक्ताचे डाग पडलेले कपडे आणि अन्य वस्तू दाखवल्या. मारणे यांनी या आरोपपत्रातील जवाबात म्हटले आहे, ‘सर्व वस्तू २१ ऑगस्ट २०१३ या दिवशी सीलबंद केल्या होत्या. आम्ही त्यावर स्वाक्षरी करून २० ऑगस्ट २०१३ हा दिनांक टाकला. मी पोलीसमित्र आहे, त्यामुळे या महत्त्वाच्या प्रकरणासाठी पोलिसांना पंच बनून साहाय्य केले.’
वरील प्रकारे आरोपपत्रात उल्लेख आहे; मात्र केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिवक्ता प्रकाश सूर्यवंशी यांनी घेतलेल्या तपासणीत न्यायालयात मारणे यांनी पूर्वी सांगितले होते, ‘‘डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जोशी यांनी डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर काही काळाने बोलावले आणि मला पंच होण्यासाठी सांगण्यात आले. मारणे यांनी मी सीलबंद वस्तू आणि पंचनामा यावर त्याच दिवशी स्वाक्षर्या केल्या.’’
मारणे यांचे म्हणणे आहे, ‘‘आरोपपत्रात उल्लेख केलेल्या केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या डी.एस्. चौहान या अधिकार्यांना मी कधीही भेटलो नाही आणि कुठलाही जवाब दिलेला नाही. पुणे शहर पोलिसांनी २० ऑगस्ट २०१३ ला दोन वेळा बोलावले आणि पंच म्हणून साक्ष घेतली.’’
मारणे यांचा चिनी खाद्यपदार्थाचा धंदा असून पोलिसांच्या शांतता समितीचे ते सदस्य आहेत.