५२ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला राजगुरुनगर, पुणे येथील कु. अथर्व संतोष औटी (वय १३ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. अथर्व संतोष औटी हा या पिढीतील आहे !

कु. अथर्व संतोष औटी याला १३ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाकडून हार्दिक शुभेच्छा !

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

राजगुरुनगर, पुणे येथील कु. अथर्व संतोष औटी याचा आज कार्तिक कृष्ण पक्ष प्रतिपदा (२०.११.२०२१) या दिवशी १३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

कु. अथर्व औटी
सौ. योगिता औटी

१. जन्मापूर्वी

१ अ. साधना : ‘मी गर्भवती असतांना प्रतिदिन गणपतीच्या मंदिरात दिवा लावत असे. व्यंकटेश स्तोत्र आणि हनुमान चालीसा म्हणत असे, तसेच कुलदेवतेचे नामस्मरण करत असे.

१ आ. अनुभूती : मी गर्भवती असतांना पाचव्या मासात मला स्वप्नात श्रीगणेशाचे दर्शन झाले होते.

२. जन्म ते १ वर्ष 

अ. अथर्व चार ते पाच मासांचा असतांना भगवान श्रीविष्णूची जी झोपण्याची मुद्रा (पाठीवर झोपण्याची मुद्रा) असते, तसा तो झोपला होता. त्याला पाहून मला ‘भगवान श्रीविष्णूचे दर्शन झाले’, असे वाटले.

आ. अथर्व नऊ – दहा मासांचा असतांना आम्ही राजगुरुनगरला रहायला आलो. त्या वेळी मला सौ. स्मिता बोरकर यांचा पहिला सत्संग मिळाला आणि माझ्या साधनेला आरंभ झाला. सत्संगाला जातांना मी अथर्वला पाळण्यात झोपवून त्याच्याभोवती नामपट्ट्यांचे मंडल घालून जात असे. मी एक घंट्याने घरी येत असे. या कालावधीत तो कधीही उठला नाही. देवानेच माझी आणि त्याचीही काळजी घेतली.

इ. अथर्वला मांडीवर झोपवतांना प.पू. भक्तराज महाराजांची भजने लावली की, तो लगेच झोपत असे.

३. १ ते ५ वर्षे

३ अ. परिस्थिती स्वीकारणे : अथर्वची शाळा घरापासून लांब अंतरावर आहे. पायी चालत जायला पंधरा मिनिटे लागायची, तरी त्याने कधीही तक्रार केली नाही. त्याचे दप्तर जड असायचे, तरीही तो स्वतःच दप्तर घेऊन शाळेत जायचा. त्याने कधीही मला त्याचे दप्तर घेऊ दिले नाही.

४. ५ ते ७ वर्षे

४ अ. ऐकण्याची वृत्ती असणे : काही वेळा सत्सगांना किंवा सेवेला जातांना मी अथर्वला ‘बहिणीच्या समवेत थांब’, असे सांगून जायचे. त्याने याविषयी कधीही तक्रार केली नाही.

५. ७ ते ८ वर्षे

५ अ. साधनेची आवड : प्रतिदिन शाळेत जातांना तो मला ‘आई, प्रार्थना सांग’, असे म्हणायचा. नामस्मरण करायला सांगितले की, तो करायचा. प्रतिदिन सकाळी आणि सायंकाळी तो रामरक्षा म्हणत असे. महाप्रसाद ग्रहण करतांना तो प्रार्थना करूनच ग्रहण करत असे.

६. ८ ते १३ वर्षे

६ अ. वक्तशीरपणा : अथर्वला शाळेत वेळेपूर्वी १० मिनिटे जायला आवडते.

६ आ. अभ्यासाचे गांभीर्य असणे : अथर्वला शाळेत सांगितलेला अभ्यास शाळेतून घरी आल्यावर लगेच पूर्ण करून मगच तो खेळायला जात असे.

६ इ. कलेची आवड : अथर्वला चित्रकलेची आवड आहे. त्याने देवता, क्रांतीकारक आणि इतरही चित्रे काढली आहेत. त्याने काढलेल्या चित्रात पुष्कळ जिवंतपणा जाणवतो. त्याने कागदापासूनही अनेक वस्तू बनवल्या आहेत. त्याच्यामधे शिकण्याची वृत्ती आहे.

कु. अथर्व याने काढलेली तुतारी वाजवणारा मावळा, छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळकृष्ण यांची चित्रे

तुतारी वाजवणारा मावळा
छत्रपती शिवाजी महाराज
बाळकृष्ण

६ ई. आज्ञापालन, सातत्य आणि चिकाटी : अथर्वला आध्यात्मिक त्रास होत असतांना त्याला आवरण काढायला सांगितले की, तो लगेच आवरण काढतो. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी ‘बालसाधकांचा आढावा घेण्याचे नियोजन करूया’, असे दैनिक ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून सांगितले होते. त्यानुसार मी त्याला नामस्मरण आणि उपायांचे महत्त्व सांगितले. त्यानंतर त्याने सलग सात दिवस १ घंटा नामस्मरण आणि तीन ते चार वेळा आवरण काढले, तसेच प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त केल्या अन् अत्तर आणि कापराचे उपायही केले. तो प्रतिदिन याचा मला आढावा द्यायचा. यातून मला त्याच्यातील ‘सातत्य आणि चिकाटी’, हे गुण शिकायला मिळाले.

६ उ. गुरुदेवांप्रती भाव : २०२० च्या गुरुपौर्णिमेला गुरुपूजन चालू असतांना अथर्वने परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्रतिमा समोर ठेवून त्यांचे चित्र रेखाटले.

६ ऊ. अथर्वमध्ये असलेला भाव : काही वेळा अथर्वला सत्संगांना घेऊन जावे लागे. त्या वेळी तो प्रार्थना, श्लोक, जयघोष गोड आवाजात म्हणायचा. साधकांना त्याचे कौतुक वाटायचे.

६ ए. राष्ट्र आणि धर्म यांची आवड : अथर्वचे मित्र ‘फ्रेंडशिप डे’ साजरा करतात. त्याने कधीही हाताला ‘फ्रेंडशिप’चा धागा बांधून घेतला नाही. त्याचे मित्र त्याला १ जानेवारीला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात; पण त्याने कधीच एक जानेवारीला त्याच्या मित्रांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत. तो गुढीपाडव्याला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि तो प्रतिदिन टिळा लावूनच शाळेत जातो.

७. अथर्वचे स्वभावदोष

हट्टीपणा, उद्धटपणा आणि ऐकण्याची वृत्ती नसणे

‘परात्पर गुरु डॉक्टर, तुमच्याच कृपेने अथर्वची गुणवैशिष्ट्ये लिहिता आली. तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. योगिता संतोष औटी (कु. अथर्वची आई), राजगुरुनगर, पुणे. (५.१.२०२१)


बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक