प्रवाशांचाही आंदोलनाला पाठिंबा; लातूर जिल्ह्याला संपाचा सर्वाधिक फटका !
संभाजीनगर – एस्.टी. महामंडळाचे सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी पुकारण्यात आलेला कर्मचार्यांचा संप अजूनही चालूच आहे. राज्य सरकारसमवेत चर्चेच्या अनेक फेर्या झाल्या असतांना यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. मराठवाड्यातही हे आंदोलन तीव्र होत असून १७ नोव्हेंबरपर्यंत ३९५ कर्मचार्यांना निलंबित करण्यात आले आहे, तर एस्.टी.चा ४२ कोटी रुपयांहून अधिक महसूल बुडाला आहे. संपामुळे आणखी काही दिवस प्रवाशांचे हाल होणार आहेत, असे यावरून दिसून येते.
संपाच्या काळात मराठवाड्यात बीड जिल्ह्यातील सर्वाधिक कर्मचार्यांचे निलंबन झाले आहे. लातूर जिल्ह्याचा सर्वाधिक १० कोटी ५० लाख रुपयांचा महसूल बुडाला आहे, असे आकडेवारीवरून समोर येते. परभणी जिल्ह्यातील ४ आगारांतील २५ कर्मचार्यांचे निलंबन झाले आहे. गेल्या १० दिवसांत १०० टक्के एस्.टी. बंद होत्या.
परभणी जिल्ह्यात गंगाखेड आणि पाथरी आगारातील प्रत्येकी ५, जिंतूरमधील ७ आणि परभणी येथील ८ कर्मचार्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. परभणी जिल्ह्यातील ४ आगारांतून दिवसाला सरासरी २५ लाख रुपयांचा महसूल मिळतो. महामंडळात प्रशासकीय कर्मचारी, चालक, वाहक, यांत्रिकी आणि प्रशासकीय, असे एकूण १ सहस्र ४०० कर्मचारी कार्यरत आहेत. सध्या यातील प्रशासकीय आणि यांत्रिक स्तरावरील जवळपास ४० ते ४५ कर्मचारी कर्तव्यावर उपस्थित आहेत, अशी माहिती परभणीचे विभाग नियंत्रक मुक्तेश्वर जोशी यांनी दिली.