शहरी नवरा हवा !

महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये अनेक मुलांचे विवाह ठरत नसल्यामुळे मुलांना ताण येऊन त्यामधील काही मुलांनी आत्महत्या केलेल्या आहेत, तर काही जण निराशेत आयुष्य जगत आहेत. यामध्ये विवाह न ठरण्याच्या प्रमुख कारणांमध्ये ‘मुलगा ग्रामीण भागामध्ये रहातो’, हे आहे. बहुसंख्य मुलींना आता शहरामध्ये रहाणारा, त्यातल्या त्यात मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरामध्ये राहून नोकरी करणारा नवरा हवा आहे. ग्रामीण भागातील मुलाकडे शेती, घर तसेच सर्व सुखसुविधा असून त्याची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरी ‘तो केवळ ग्रामीण भागामध्ये रहातो; म्हणून नको’, अशी मुलींची उथळ मानसिकता झाली आहे.

शहरामध्ये रहाणार्‍या मुलाकडे नोकरी सोडून अन्य उत्पन्न काही नसले तरी चालेल; परंतु शहरात रहायला हवे, असे मुलींना वाटते. यामध्ये स्वतःचे ‘करीअर’ही व्हायला हवे, असाही काही मुलींचा विचार आहे. ग्रामीण भागामध्ये करीअर करायला वाव नाही, असे कुठेतरी वाटते. ‘करीअर म्हणजे नोकरी करणे’, हेच समीकरण मुलींच्या मनात निर्माण झालेले आहे. ग्रामीण भागामध्येही लघुउद्योग करू शकतो. खरेतर ‘चांगला संसार करून मुलांवर चांगले संस्कार करणे’ हेही एक मोठे करीअर आहे; परंतु हे संस्कार मुलींवर केलेले नसल्यामुळे जीवनाचा साथीदार निवडतांना त्यांच्या विचारांची दिशा कुठेतरी चुकत आहे. बाह्य झगमगाटाकडे पाहून उथळपणाने निर्णय घेण्याने नंतर पश्चाताप करण्याची वेळही काही मुलींवर ओढवलेली आहे. जीवनाचा साथीदार निवडण्यामध्ये मुलींच्या असणार्‍या या अटीपुढे मुलींच्या आई-वडिलांचेही काही चालत नाही. त्यांना जरी मुलीचा हा विचार अयोग्य वाटत असला, तरी ते तिला समजावू शकत नाहीत. येथे जीवनाकडे बघण्याची दृष्टी आणि संस्कार किती आवश्यक आहेत, हे पुन्हा एकदा अधोरेखित होते. मुलांच्या दृष्टीने आलेल्या या संकटाला कसे सामोरे जायचे ? हे त्यांना कळत नाही. ग्रामीण भागातील ‘प्रॉपर्टी’ सोडून शहरात जाऊ शकत नाही आणि ग्रामीण भागातच रहायचे तर जीवनसाथी मिळत नाही, अशा प्रकारची मुलांची कोंडी झाली आहे. बाह्यतः जरी वरील कारणे वाटत असली तरी जन्म, मृत्यू आणि विवाह हे प्रारब्धानुसारच होतात. विवाह न होण्यामध्ये मुख्यतः आध्यात्मिक अडथळे असतात. यासाठी आध्यात्मिक स्तरावरच उपाययोजना करावी लागते. जीवनातील ८० टक्के समस्या आध्यात्मिक कारणांमुळे होतात, हे मुलांना धर्मशिक्षण न दिल्यामुळे ठाऊक नाही. हिंदु राष्ट्रात हिंदूंना धर्मशिक्षण मिळेल, त्यामुळे त्यांना जीवनातील समस्या सोडवणे कठीण जाणार नाही.

– वैद्या (कु.) माया पाटील, देवद, पनवेल.