रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्री. देवदत्त गोपाळ कुलकर्णी आणि त्यांची मुलगी कु. तृप्ती कुलकर्णी यांना लाभलेला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा चैतन्यदायी सत्संग !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. देवदत्त गोपाळ कुलकर्णी (वय ७९ वर्षे) आणि त्यांची मुलगी कु. तृप्ती कुलकर्णी यांना लाभलेला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा चैतन्यदायी सत्संग !

परात्पर गुरु डॉ. आठवले

१८.११.२०२१ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणारे श्री. देवदत्त गोपाळ कुलकर्णी यांचा सहस्रचंद्रदर्शन शांती विधी आहे.

(‘व्यक्तीने ८० व्या वर्षात पदार्पण केल्यावर हा विधी करतात. ‘विधी करणार्‍या व्यक्तीचे संभाव्य आजारपण, अपमृत्यू इत्यादींपासून रक्षण व्हावे’, हा या विधीमागील उद्देश आहे.’ – संकलक)

एकदा श्री. कुलकर्णी आणि त्यांची मुलगी कु. तृप्ती कुलकर्णी यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या वेळी त्यांच्यात झालेले संभाषण येथे दिले आहे.

श्री. देवदत्त कुलकर्णी

श्री. देवदत्त गोपाळ कुलकर्णी यांना सहस्रचंद्रदर्शन शांती विधीनिमित्त सनातन परिवाराच्या वतीने नमस्कार !

१. श्री. देवदत्त कुलकर्णी यांच्यात साधकाचे गुण असल्याने ते साधना करत असणे आणि त्यामुळे त्यांच्यावर गुरुकृपा होणे

परात्पर गुरु डॉ. आठवले (कु. तृप्ती यांना उद्देशून) : या वयात बाबांची प्रकृती एवढी चांगली आहे !

श्री. देवदत्त कुलकर्णी : तुमची कृपा !

परात्पर गुरु डॉ. आठवले : हे माझ्या कृपेमुळे झाले नसून तुमच्या साधनेमुळे झाले आहे.

श्री. देवदत्त कुलकर्णी : तीही तुमचीच कृपा; कारण तुम्हीच मला साधनेला लावलेत !

परात्पर गुरु डॉ. आठवले (हसून) : मी अनेकांना साधना सांगतो; पण किती जण ऐकतात ? तुमच्यात काहीतरी गुण आहेत; म्हणून तुम्ही माझे ऐकले आणि साधना करत आहात; म्हणून तुमच्यावर कृपा झाली.

श्री. देवदत्त कुलकर्णी : माझ्यात गुणही तुमच्याच कृपेमुळे आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले (पुष्कळ हसून) : बरं बाबा ! तुम्ही जिंकलात, मी हरलो !

२. श्री. कुलकर्णी यांची आध्यात्मिक पातळी ६० टक्क्यांहून अधिक असल्याने त्यांना पुन्हा जन्म नसणे

कु. तृप्ती कुलकर्णी

श्री. देवदत्त कुलकर्णी : माझी आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित करण्यात आले होते. तेव्हा तुम्ही सांगितले होते, ‘‘आता पुढे पुढे जायचे. मागे वळून पहायचे नाही’’; पण मला क्षमा करा. मी तुमचे आज्ञापालन करू शकलो नाही. गेल्या वर्षी माझी आध्यात्मिक पातळी ६३ टक्के होती, ती न्यून होऊन आता ६२ टक्के झाली आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले : आध्यात्मिक पातळी ६० टक्क्यांहून अधिक आहे ना, याला महत्त्व आहे. आध्यात्मिक पातळी ६० टक्क्यांच्या पुढे असल्याने तुम्हाला पुन्हा जन्म नाही. आध्यात्मिक पातळी वर-खाली होतच असते.

३. श्री. कुलकर्णी यांचा तन, मन आणि धन यांचा त्याग झाला असून त्यांनी साधनेसाठी मुलीचाही त्याग केलेला असणे

श्री. देवदत्त कुलकर्णी : माझी आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी मी आणखी काय प्रयत्न करायला हवेत ? सर्वस्वाचा त्याग कसा करायचा ?

परात्पर गुरु डॉ. आठवले : आता जसे प्रयत्न चालू आहेत, तसेच चालू ठेवा. ‘तुमची प्रगती होत आहे आणि इथून पुढेही ती होतच रहाणार आहे’, हे लक्षात ठेवा ! वाईट वाटायला नको. अध्यात्मात तन, मन आणि धन यांचा त्याग करायचा असतो. तुमचा तन, मन आणि धन यांचा त्याग झाला आहे अन् आता तुम्ही तृप्तीचाही (मुलीचाही) त्याग केला आहे. (‘कु. तृप्ती याही पूर्णवेळ साधना करतात.’ – संकलक) आणखी काय हवे ?

४. श्री. कुलकर्णी यांनी त्यांच्या एकुलत्या एक मुलीची काळजी वाटत नसल्याचे सांगणे

परात्पर गुरु डॉ. आठवले : तुम्हाला तृप्ती एकुलती एक मुलगी ! तुमच्यानंतर तिचे कुणी नाही. तुम्हाला तिची काळजी वाटते का ?

श्री. देवदत्त कुलकर्णी : जराही नाही. तुम्ही आहात ना !

५. श्री. कुलकर्णी यांनी मुलीला पूर्णवेळ साधना करण्याची अनुमती दिल्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांना प्रसाद देणे

श्री. देवदत्त कुलकर्णी : तुम्ही मध्यंतरी माझी आठवण काढून मला प्रसाद पाठवलात. तेव्हा मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘मी काहीच करत नाही, तरीही तुम्ही माझी आठवण काढून प्रसाद कसा काय पाठवलात ?’

परात्पर गुरु डॉ. आठवले : तुम्ही अशा मुलीला जन्म दिलात, तिला पूर्णवेळ साधना करायची अनुमती दिलीत; म्हणून तुम्हाला खाऊ दिला.

६. श्री. कुलकर्णी यांच्या पत्नी (कै.) सुजाता यांच्यावर प्रकाशित केलेल्या ग्रंथांविषयी

६ अ. ग्रंथातील कु. तृप्ती यांचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयीचे कृतज्ञतापर लिखाण वाचून श्री. कुलकर्णी यांचा भाव जागृत होणे श्री. देवदत्त कुलकर्णी : तुम्ही माझी पत्नी (कै.) सुजाता (६१ टक्के आध्यात्मिक पातळी) हिच्यावर ३ ग्रंथ प्रकाशित केलेत. तिसर्‍या ग्रंथात तृप्तीने ‘तुम्ही तिच्या जीवनात आला नसतात, तर काय झाले असते ?’, यावर दीड-दोन पाने लिहिली आहेत. ते वाचून माझा भाव पुष्कळ जागृत झाला आणि तुमच्याप्रती कृतज्ञताही वाटली.

६ आ. साधिका कु. गुलाबी धुरी यांनी पत्नीच्या केलेल्या सेवेविषयीचे सूत्र ग्रंथात वाचून श्री. कुलकर्णी यांच्या नातेवाइकांनी कु. गुलाबी यांना नमस्कार सांगणे

श्री. देवदत्त कुलकर्णी : साधिका कु. गुलाबी धुरी यांनी सुजाताच्या केलेल्या सेवेविषयी माझ्या धाकट्या भावाने (श्री. अनंत कुलकर्णी (वय ६९ वर्षे) यांनी) त्या ग्रंथात वाचले आणि त्याने कु. गुलाबी धुरी यांना साष्टांग नमस्कार सांगायला सांगितला. माझ्या चुलत बहिणीनेही (सौ. शीला तेरदाळकर (वय ६६ वर्षे) यांनी) तो ग्रंथ वाचून तुम्हाला नमस्कार सांगितला आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले : हे सगळे गुलाबीला सांगितले कि नाही ?

श्री. देवदत्त कुलकर्णी : हो.

७. श्री. कुलकर्णी बोलत असतांना सुगंध येणे

परात्पर गुरु डॉ. आठवले (कु. तृप्ती यांना उद्देशून) : खूपच छान ! बाबा बोलत असतांना सुगंध आला. आता बाबांचे महत्त्व कळले का ? त्यांच्या वाणीला गंध आहे !’

– कु. तृप्ती कुलकर्णी (मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.१०.२०२१)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक