भारताची ओळख राजांमुळे नव्हे, तर ऋषिमुनींमुळे ! – केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान

डावीकडे केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान

वाराणसी (उत्तरप्रदेश) – भारताची ओळख राजांमुळे नव्हे, तर ऋषिमुनींमुळे आहे. त्यांनी भारतीय संस्कृती समृद्ध करण्यासाठी सहस्रो वर्षे साधना केली. त्याचेच फळ म्हणजे आपली सनातन संस्कृती आहे, जिच्यात संपूर्ण जगाला मार्ग दाखवण्याची क्षमता आहे, असे गौरवोद्गार केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांनी अखिल भारतीय संत समिती आणि गंगा महासभा यांनी येथील ‘रुद्राक्ष कन्वेंशन सेंटर’ येथे आयोजित केलेल्या ‘संस्कृती संसदे’त काढले.

१. राज्यपाल खान पुढे म्हणाले की, आमचे मानणे आहे की, प्रत्येक जिवामध्ये शंकर पहाता आले पाहिजे. ‘मानव सेवा’ ही ‘माधव सेवा’ आहे. भारताच्या आध्यात्मिक संस्कृतीमुळेच स्वामी विवेकानंद यांचा विदेशांमध्ये सन्मान करण्यात आला. महंमद पैगंबर यांनी म्हटले होते की, मी मक्केमध्ये रहात आहे. मी कधी भारतात गेलो नाही; मात्र भारताच्या भूमीची शीतल हवा येथे अनुभवत आहे.

२. विश्‍व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार म्हणाले की, मंदिर सरकारीकरणाचा कायदा अचानक बनवला गेला आहे. तो लोकांनी स्वीकारलेला नाही. तो पालटण्याची आवश्यकता आहे. काही साम्यवादी स्वयंसेवी संघटना आणि चर्च यांच्याकडून ‘हिंदू चुकीचेच आहेत’, अशी भावना हिंदूंमध्ये निर्माण केली गेली आहे.

३. अखिल भारतीय संत समितीचे महामंत्री स्वामी जितेंद्रानंद सरस्वती म्हणाले की, मंदिर सरकारीकरणाचा कायदा हा ‘काळा कायदा’ आहे.