दळणवळण बंदीच्या काळात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ऑनलाईन’ स्वरक्षण प्रशिक्षण वर्ग चालू करण्यात आले. मुंबई येथे ‘ऑनलाईन’ स्वरक्षण प्रशिक्षण वर्ग घेतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत पुजारे यांना शिकायला मिळालेली सूत्रे, गुणवृद्धीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि त्यांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. स्वरक्षणवर्ग चालू होण्यापूर्वी – ‘दळणवळण बंदीमुळे प्रत्यक्ष वर्ग घेता येत नसला, तरी ‘ऑनलाईन’ वर्ग घेऊ शकतो’, हे कळल्यावर चांगले वाटणे
‘मार्च २०२० मध्ये दळणवळण बंदीमुळे प्रत्यक्ष स्वरक्षणवर्ग घेता येत नसले, तरी ते ‘ऑनलाईन’ आपण घेऊ शकतो’, हे समजल्यावर मला चांगले वाटले. आता पहिल्यापेक्षा आपल्याला अधिक व्यापक होता येईल’, याची मला जाणीव झाली.
२. स्वरक्षणवर्ग चालू झाल्यानंतर साधक आणि धर्मप्रेमी यांचा वाढलेला सहभाग !
२ अ. ‘काळानुसार भगवंताचे कसे नियोजन असते ?’, याची जाणीव होऊन सर्वांचा उत्साह वाढणे : जुन्या वर्गातील सर्वांना ‘ऑनलाईन’ स्वरक्षण वर्गाविषयी माहिती दिल्यानंतर दोन वर्ग चालू झाले. त्या वेळी ‘काळानुसार भगवंत सर्व नियोजन करून ठेवतो’, हे अनुभवायला मिळाले. काही प्रशिक्षक साधक जे वेळ देऊ शकत नव्हते, त्यांनाही या ‘ऑनलाईन’ वर्गामुळे वेळ देता येत होता. त्यामुळे सर्वांचाच उत्साह वाढला.
२ आ. धर्मप्रेमींना ‘चर्चा हिन्दू राष्ट्र की’ या उपक्रमात जोडल्यावर त्यांचे हिंदु धर्माविषयीचे प्रेम आणि कार्याप्रती ओढ वाढणे : घरच्या घरी ‘ऑनलाईन’ वर्ग उपलब्ध झाल्याने समाजातील धर्मप्रेमींचाही चांगला प्रतिसाद मिळू लागला. या वर्गामुळे घरातील वातावरण चांगले आणि उत्साही वाटत असल्याची प्रतिक्रिया काहींनी दिली. वर्गातील धर्मप्रेमींना हिंदु जनजागृती समितीच्या अंतर्गत होणार्या ‘चर्चा हिन्दू राष्ट्र की’ या ऑनलाईन उपक्रमात जोडल्यावर त्यांचे हिंदु धर्माविषयीचे प्रेम आणि कार्याप्रतीची ओढ वाढली. चर्चासत्रांतील वेगवेगळ्या विषयांतून त्यांना चांगली माहिती मिळाल्याने ‘हिंदु राष्ट्र’ या संकल्पनेविषयी त्यांच्यात आत्मियता निर्माण झाल्याचे जाणवले.
२ इ. साधकांच्या मुलांमध्ये प्रशिक्षणाची आवड निर्माण होऊन त्यांची व्यष्टी साधना अन् समष्टी सेवाही चालू होणे : साधकांच्या मुलांसाठीही ‘ऑनलाईन’ स्वरक्षणवर्ग चालू केले. वर्ग घरीच असल्याने त्यांच्यात प्रशिक्षणाची आवड निर्माण झाली, तसेच त्यांची व्यष्टी साधनाही चालू झाली. ते स्वतःत जाणवलेले स्वभावदोषही मोकळेपणाने सांगू लागले. काही साधक प्रशिक्षणार्थी आयोजनाची सेवा करणे, प्रशिक्षण घेण्याच्या दृष्टीने पुढाकार घेणे, ‘ऑनलाईन’ सत्संगाच्या लिंक मित्रांना पाठवणे, अशा समष्टी सेवाही करू लागले.
२ ई. सेवेची फलनिष्पत्ती वाढून ‘भगवंत काळानुसार साधना आणि सेवा शिकवून ती करवूनही घेतो’, याची प्रचीती येणे : पूर्वी प्रत्यक्ष वर्ग घ्यायला जातांना प्रवासात, प्रशिक्षणार्थींना बोलवण्यात आणि त्यांची वाट पहाण्यात वेळ जात होता. तो सर्व वेळ आता वाचू लागला असून अल्प वेळेत अधिक धमप्रेमींपर्यंत पोचता येत आहे. अशा प्रकारे दळणवळण बंदीपूर्वी जी फलनिष्पत्ती मिळत नव्हती, ती आता अल्प वेळेतही मिळत असल्याचे जाणवले. ‘भगवंत काळानुसार साधना आणि सेवा शिकवतो अन् ती करवूनही घेतो’, याची आता प्रचीती येत आहे.
२ उ. काही प्रशिक्षणार्थी अनेक उपक्रमांतून क्रियाशील होत असणे आणि भगवंताने समाजात एक फळी आधीच सिद्ध करून ठेवल्याचे लक्षात येणे : काही प्रशिक्षणार्थी ‘ऑनलाईन’ आंदोलनात सहभागी होत आहेत. घरातील सदस्यांना आपले उपक्रम ऐकायला सांगणे आणि अन्य सेवा करणे, अशा रितीने ते क्रियाशील होत आहेत. या सगळ्यातून ‘भगवंताने समाजात एक फळी आधीच सिद्ध करून ठेवली आहे, ज्यांच्यापर्यंत पोचण्यात आम्ही नेहमीच न्यून पडतो’, असे मला जाणवले.
२ ऊ. एका धर्मप्रेमीने समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांचे ‘हलाल सर्टिफिकेट’ या विषयावरील भाषण ऐकणे आणि तो ‘व्हिडिओ’ मित्रपरिवारात पाठवून हलालचा शिक्का असलेल्या वस्तू विकत घेण्याचे टाळण्यास सांगणे : नालासोपारा येथील एक धर्मप्रेमी प्रशिक्षणवर्गात सहभागी होतात. त्यांनी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांचे ‘हलाल सर्टिफिकेट’ या विषयावरील भाषण ऐकले होते. त्यांनी तो ‘व्हिडिओ’ आपल्या मित्रपरिवारात पाठवला आणि त्यांना हलालचा शिक्का असलेल्या वस्तू विकत घेण्याचे टाळण्यास सांगितले. त्यांनी ‘मॅकडोनल्ड’मधून खाद्यपदार्थ मागवतांना दूरभाष करून विचारले, ‘‘तुमच्याकडे ‘झटका’ मांस मिळते कि ‘हलाल’?’’ त्या वेळी दुकानातील व्यक्तीने असे वेगवेगळे मिळत नसल्याचे सांगितले. त्यावर धर्मप्रेमींनी त्यांची मागणी रहित केली. आता ते समितीच्या कार्यकर्त्यांच्या समवेत जाऊन प्रत्यक्ष सेवाही करत आहेत.
२ ए. एका प्रशिक्षणार्थीने विचारलेल्या प्रश्नांतून त्याचे राष्ट्र आणि समाज यांविषयीचे प्रेम वृद्धींगत झाल्याचे दिसणे अन् स्वरक्षणवर्गाच्या उपक्रमातून भगवंताचा आदर्श समाज घडवण्याचा उद्देश सफल होत असल्याचे प्रखरतेने जाणवणे : माहीम येथील एका प्रशिक्षणार्थीने विचारले, ‘‘आता संघटितपणे राष्ट्र-कार्य करण्याची आवश्यकता आहे. कोरोनामुळे अनेक लोकांना त्रास होत आहे, तर आपण रुग्णालयात साहाय्याला जाऊया का ?’’ त्याच्या बोलण्यात राष्ट्र आणि समाज यांविषयीचे प्रेम दिसत होते. वर्गात जे विषय होत होते, त्यामुळे त्याचे राष्ट्र-धर्म प्रेम वाढले होते. तो साधनेलाही प्राधान्य देत होता. या प्रसंगातून भगवंताचा स्वरक्षणवर्ग उपक्रमातून आदर्श समाज घडवण्याचा जो उद्देश आहे, तो सफल होत असल्याचे प्रखरतेने जाणवले. याविषयी पुष्कळ कृतज्ञताही वाटली.
३. ‘ऑनलाईन’ स्वरक्षणवर्ग सेवेतून शिकायला मिळालेली सूत्रे
अ. वेळेचे नियोजन करण्याची सवय लागून व्यष्टी आणि समष्टी साधनेची घडी बसवता आली. ‘स्वतःचा वेळ नेमका कुठे वाया जात आहे ?’, याविषयी चिंतन झाले.
आ. कराटे प्रकारांत आणखी नावीन्यपूर्ण प्रकार कसे करू शकतो ?’, असा विचार पूर्वी केला जात नव्हता. आता वर्गात कराटेच्या नवीन प्रकारांचा उपयोग कसा करायचा ? हे शिकता आले.
इ. वर्गातील प्रशिक्षणार्थींच्या चांगल्या प्रतिसादामुळे ‘माझ्यातही उत्साह निर्माण व्हायला हवा’, असे वाटून वर्गात तात्त्विक विषय घेतांना, एखादा प्रसंग सांगतांना ‘तो स्वतः समवेत घडला आहे’, असा भाव ठेवून आत्मीयतेने सांगण्याचा प्रयत्न चालू झाला. मनात भीती निर्माण झाल्यास लगेच गुरुपादुकांचे स्मरण केले जाऊन बळही मिळू लागले.
४. स्वतःमध्ये गुण आणि भाव वृद्धी करण्याच्या दृष्टीने झालेले प्रयत्न
अ. पूर्वी वर्गाला अभ्यास करून जाण्याचा माझा भाग अल्प होता. ‘ऑनलाईन’ वर्ग घेतांना प्रशिक्षणार्थी प्रत्यक्ष समोर नसल्याने तात्त्विक विषय पूर्ण होईपर्यंत त्यांचा सहभाग टिकून रहाणे आवश्यक असते. त्यासाठी ‘अभ्यास करून स्पष्ट बोलण्याचा प्रयत्न चालू झाला.
आ. पूर्वी ऐकण्याची वृत्ती नसल्याने प्रत्यक्ष संपर्क सेवेत इतर व्यक्ती बोलतांना मी मध्येच बोलायचो. आता भ्रमणभाषवर संपर्क करतांना समोरच्या व्यक्तीचे पूर्ण ऐकून घेण्याचा भाग वाढला आहे.
इ. प्रारंभी ‘ऑनलाईन’ व्हिडिओच्या माध्यमातून पहिला वर्ग घेतांना प्रतिमा आड येत होती. त्या वेळी गुरुपादुकांचे स्मरण करून ‘भगवंतासमोरच प्रशिक्षण करत आहे’, असा भाव ठेवल्यावर प्रतिमा जपणे या अहंवर मात करता आली.
ई. प्रत्येक वर्गापूर्वी प्रशिक्षणार्थींना संपर्क करतांना ‘भगवंतच संपर्क करत असून तोच बोलणार आहे’, असा भाव ठेवल्यावर चांगला प्रतिसाद मिळू लागला.
५. ‘ऑनलाईन’ स्वरक्षण प्रशिक्षण शिबिराच्या वेळी आलेल्या अनुभूती
५ अ. शिबिरात नेहमीपेक्षा अधिक चैतन्य आणि निर्गुण तत्त्व अनुभवता येणे : ‘स्वरक्षण प्रशिक्षण शिबिर आता दळणवळण बंदीमुळे होणार नाही’, असा विचार मनात येत होता. गुरुकृपेने जेव्हा हे शिबिर ‘ऑनलाईन’ झाले, तेव्हा नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात चैतन्य आणि निर्गुण तत्त्व अनुभवता आले.
५ आ. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांचे मार्गदर्शन ऐकतांना श्वास घ्यायला त्रास होणे आणि परात्पर गुरुदेवांना प्रार्थना केल्यावर हलके वाटून ‘ते डोक्यावर हात फिरवत आहेत’, असे जाणवणे : सद्गुरु (कु.) स्वातीताई यांनी मार्गदर्शनात साधनेविषयी सांगितले. त्या वेळी मन अतिशय भरून आले. श्वास घ्यायला त्रास होऊन भीती वाटायला लागली. त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना केली आणि पुढच्या मिनिटाला मला हलके वाटू लागले. ‘प्रत्यक्ष परात्पर गुरुदेव माझ्या डोक्यावर हात फिरवत आहेत’, असे जाणवून सूक्ष्मातून त्यांचा स्पर्श अनुभवता आला.
५ इ. नामजपादी उपाय केल्याने ‘इंटरनेट’ आणि अन्य अडचणी दूर होणे अन् ते नियमित झाल्यावर देवाचे अस्तित्व अनुभवता येणे : खोक्यांचे उपाय, उदबत्तीने भ्रमणभाषवरील त्रासदायक आवरण काढणे इत्यादी नामजपादी उपाय केल्याने ‘इंटरनेट’ आणि अन्य अडचणी दूर होऊ लागल्या. ‘हे नामजपादी उपाय नियमित होऊ लागल्यावर ‘स्वतःलाही चैतन्य मिळत आहे’, असे जाणवून देवाचे अस्तित्व अनुभवता आले.
५ ई. एक साधक देवीचे महात्म्य सांगत असतांना प्रत्यक्ष देवीचे रूप समोर येऊन देवीचे चैतन्य अनुभवता येणे : महिला शौर्यजागृती व्याख्यानात एक साधक देवीचे महात्म्य सांगत असतांना भाव जागृत होऊन माझ्या अंगावर रोमांच यायचे. प्रत्यक्ष त्या त्या देवीचे रूप समोर येऊन मला देवीचे चैतन्य अनुभवता येत होते. सर्व महिलांचा प्रतिसाद ऐकतांना मी मध्येच डोळे बंद केल्यावर मला प्रत्येक महिलेमध्ये दुर्गादेवी दिसत होती. सर्वांचा प्रतिसाद पाहून मला वेगळाच आनंद अनुभवता आला.
– श्री. हेमंत पुजारे, मुंबई (२.१०.२०२०)
अखंड गुरुस्मरणात ठेवा, ही एकच प्रार्थना ।संधी सेवेची गुरु देती, पात्रता नसतांना । सतत चुका करूनी हानी केली गुरुसेवेची । अर्जुनाप्रमाणे बनण्याचे ध्येय दिले गुरूंनी । अखंड गुरुस्मरणात ठेवा, ही एकच प्रार्थना । वरील सर्व चिंतन परात्पर गुरुदेवांनी माझ्याकडून लिहून घेतले, त्यासाठी गुरुदेवांच्या चरणी अनंत शरणागतभावाने कृतज्ञता व्यक्त करतो.’ – गुरुचरणांचा दास, श्री. हेमंत पुजारे, मुंबई (२.१०.२०२०) |
|