महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या कु. तेजल पात्रीकर यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित केलेला ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हा नामजप ऐकताना साधकांना आलेल्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. तेजल पात्रीकर (संगीत विशारद) यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित केलेला ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हा नामजप ऐकण्याच्या प्रयोगात सहभागी झालेल्या साधकांना आलेल्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती

‘निर्विचार’, ‘ॐ निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हा नामजप करण्याचे महत्त्व !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘मन जोपर्यंत कार्यरत आहे, तोपर्यंत मनोलय होत नाही. मन निर्विचार करण्यासाठी स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन, भावजागृती इत्यादी कितीही प्रयत्न केले, तरी मन कार्यरत असते, तसेच एखाद्या देवतेचा नामजप अखंड केला, तरी मन कार्यरत असते आणि मनात देवाच्या आठवणी, भाव इत्यादी येतात. याउलट ‘निर्विचार’, ‘ॐ निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हा नामजप अखंड केला, तर मनाला दुसरे काहीच आठवत नाही. याचे कारण म्हणजे अध्यात्मातील ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, या नियमानुसार या नामजपामुळे मन त्या शब्दाशी एकरूप होऊन निर्विचार होते, म्हणजे प्रथम मनोलय, नंतर बुद्धीलय, त्यानंतर चित्तलय आणि शेवटी अहंलय होतो. त्यामुळे निर्गुण स्थितीत लवकर जाण्यास साहाय्य होते.’


संत आणि साधक यांना मिळालेले सूक्ष्म ज्ञान आणि साधकांना आलेल्या अनुभूती यांतील साम्य !

‘निर्विचार’, ‘ॐ निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हे नामजप केल्यावर काय अनुभूती येतात, याची माहिती सद्गुरु गाडगीळ आणि सूक्ष्म ज्ञान प्राप्तकर्त्या कु. मधुरा भोसले यांनी सांगितली आहे. त्यात सांगितल्याप्रमाणे चांगल्या अनुभूती बहुतेक साधकांना आल्या आहेत, हे येथील लिखाणावरून लक्षात येईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कु. तेजल पात्रीकर

१८ ते २५.७.२०२१ या कालावधीत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. तेजल पात्रीकर (संगीत विशारद) यांच्या आवाजात ‘श्री निर्विचाराय नमः।’ हा नामजप ध्वनीमुद्रित करण्यात आला. त्यानंतर रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील तीव्र आध्यात्मिक त्रास असलेले साधक, आध्यात्मिक त्रास असलेले ६० टक्के अन् त्यांहून अधिक आध्यात्मिक पातळीचे साधक, आध्यात्मिक त्रास नसलेले साधक आणि आध्यात्मिक त्रास नसलेले ६० टक्के अन् त्यांहून अधिक आध्यात्मिक पातळीचे साधक, असे एकूण १८ साधक अन् संत यांना ७ दिवस प्रतिदिन १० मिनिटे ऐकवण्यात आला. त्या वेळी या प्रयोगात उपस्थित असलेल्या काही साधकांना आलेल्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

१. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकाला आलेल्या त्रासदायक अनुभूती

एक साधक

१९.७.२०२१

‘प्रयोगाच्या वेळी बराच वेळ मला काही समजत नव्हते. मी शुद्धीवर आल्यावर मला थकवा जाणवत होता.

२०.७.२०२१

१. आदल्या दिवशी झालेल्या प्रयोगानंतर (सायंकाळी ६ वाजता) मी लवकरच जेवण केले आणि झोपलो. दुसर्‍या दिवशी प्रयोगापर्यंत (दुपारी ४.३० वाजेपर्यंत) मला सारखी झोप येत होती.

२. प्रयोगाच्या वेळी माझे मन अस्वस्थ होते. माझे लक्ष जपावर केंद्रित होत नव्हते. माझ्या मनात सतत मायेचे विचार येत होते. प्रयोगानंतरही माझे मन अस्वस्थ झाले होते.’

(‘श्री निर्विचाराय नमः ।’ हा जप नर्गुण स्वरूपाचा असल्याने साधकाला आध्यात्मिक लाभ होऊन त्याला त्रास देणार्‍या वाईट शक्तीला त्रास झाला आणि त्यामुळे साधकाला हे त्रास जाणवले.’ – संकलक)

२. आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधिकेला आलेल्या चांगल्या अनुभूती

कु. म्रिणालिनी देवघरे

कु. म्रिणालिनी देवघरे

१८.७.२०२१

‘श्री निर्विचाराय नमः ।’ हा जप ऐकतांना आरंभी माझे मन एकाग्र होत नव्हते. माझ्या मनात थोडे विचार येत होते. थोड्या वेळाने माझे शरीर आतून हलत असल्याचे मला जाणवले. मला माझ्या शरिरावरील त्रासदायक शक्तीचे आवरण एका क्षणात नष्ट होत असल्याचे दिसले. जप झाल्यावर मला हलके वाटू लागले.

१९.७.२०२१

१. मला माझे शरीर आतून सावकाश हलत असल्याचे जाणवले. त्या वेळी मला शक्तीची स्पंदने जाणवत होती.

२. मला ‘श्री निर्विचाराय नमः ।’ या नामजपाचे निळ्या रंगाचे कवच माझ्या शरिराभोवती निर्माण होत आहे’, असे दिसले.

३. माझे डोके मागच्या बाजूला झुकत होते. मला निर्गुण तत्त्व आणि आकाशतत्त्व जाणवले.

२०.७.२०२१

१. जप चालू होण्यापूर्वी मनात भरतनाट्यम्मधील ‘कालीकौत्वम्’ या नृत्यप्रकारातील मारक भावाचे बोल आपोआप चालू झाले.

२. जप चालू झाल्यावर आरंभी माझी सूर्यनाडी जागृत झाली आणि माझे शरीर पुष्कळ गरम झाले.

३. ‘जपातील शक्तीमुळे माझ्या शरिरावरचे वाईट शक्तीचे आवरण नष्ट होत आहे’, असे मला जाणवले.

४. त्यानंतर मला ‘माझ्या शरिराचा उजवा भाग आतून हलत आहे’, असे जाणवले. मग हळूहळू त्या संवेदना माझ्या डोक्याच्या मध्यभागापर्यंत आल्या.

५. मला ‘माझ्या शरिराचा डावा भाग स्थिर आहे’, असे जाणवले.

६. जपातील शक्तीमुळे माझे शरीर उजव्या बाजूला झुकत होते आणि मला ‘माझ्या शरिरात पुष्कळ शक्ती जात आहे’, असे जाणवले. त्यानंतर माझे ध्यान लागले.

७. मला देवीच्या मारक नृत्यमुद्रा कराव्याशा वाटत होत्या. त्या वेळी मला देवीची आठवण येत होती आणि ‘ध्यानमंदिरातील देवीच्या मूर्तीला पाहून मी तिला मिठी मारत आहे’, असे मला वाटले.

८. माझे शरीर स्थुलातून प्रयोगाच्या ठिकाणी बसले आहे; पण ‘सूक्ष्मातून मी नृत्य करत आहे’, असे मला अनुभवायला येत होते.

९. ‘जप चालू असतांना नृत्यातील बोलांची स्पंदने आणि जपाची स्पंदने एकसारखी आहेत’, असे मला जाणवले.

१०. काही नृत्यांत अडवू (टीप) आहेत. ‘त्यांची स्पंदने आणि जपाची स्पंदने एकसारखी आहेत’, असे मला वाटले.

(टीप : अडवू – नृत्याचा ‘श्री गणेशा’ (आरंभ) अडवूंनी केला जातो. पदन्यास (पायांच्या हालचाली), हातांच्या हालचाली आणि नृत्यहस्त (हाताने केल्या जाणार्‍या विविध मुद्रा) एकत्रितपणे करणे’, याला ‘अडवू’ असे म्हणतात.)

११. ‘तै-युम-तत्-तत्-तै-युम-ता-हा’, या बोलांवर जो अडवू आहे, त्यांवर मानसरित्या पदन्यास करतांना अडवूच्या बोलांऐवजी मला ‘श्री निर्विचाराय नमः ।’, हा नामजप ऐकू येत होता. मला वाटले, ‘अडवूच्या बोलांऐवजी ‘श्री निर्विचाराय नमः ।’, हा जप त्या अडवूशी एकरूप झाला आहे.’

१२. जप झाल्यानंतरही मला ‘ध्यानातून बाहेर येऊ नये’, असे वाटले.

१३. मला ‘माझ्या डोक्यावर जाणवणारी संवेदना मध्यभागातून डाव्या बाजूला सरकली’, असे जाणवले आणि त्या वेळी थंडावा जाणवला. तेव्हा माझे पूर्ण शरीर मंद गतीने आतून हलत होते.

१४. ‘जप झाल्यावरही साधारण २० ते २५ मिनिटे मी ध्यानावस्थेत आहे’, असे मला वाटत होते.’

श्री. मनोज कुवेलकर

३. आध्यात्मिक त्रास नसलेल्या आणि आध्यात्मिक पातळी ६० टक्क्यांहून अधिक असलेल्या साधकाला आलेल्या चांगल्या अनुभूती

श्री. मनोज कुवेलकर (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के)

१९.७.२०२१

‘जपाच्या वेळी आरंभी प्रार्थना करतांना मला ८ हात असलेली श्री दुर्गादेवी दिसली. नंतर मला माझ्या आज्ञाचक्रावर पिवळा प्रकाश दिसला आणि त्यानंतर माझे ध्यान लागले.

२१.७.२०२१

१. मला श्रीविष्णूचे विराट रूप दिसले. त्याला २० हात होते. त्याच्या हातांमध्ये शस्त्रे होती आणि त्याचा एक हात आशीर्वाद देणारा होता. मला श्रीविष्णूमध्ये प.पू. गुरुदेव दिसत होते.

२. त्यानंतर मला १० हात असलेली श्री दुर्गादेवी दिसली. तिच्या प्रत्येक हातात शस्त्र होते. त्यानंतर मला ध्यान लागल्यासारखे झाले.

२४.७.२०२१

१. जप करतांना आरंभी मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे चरण दिसले.

२. नंतर ‘माझ्या तोंडवळ्यातून वाईट शक्ती बाहेर जाऊन ती आकाशात विलीन होत आहे’, असे मला दिसत होते.

३. काही वेळाने मला ‘माझ्या तोंडवळ्यावर पांढरा प्रकाश येत आहे’, असे दिसत होते. त्यानंतर माझे मन निर्विचार झाले आणि माझे ध्यान लागले.’

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक