भावसत्संग ऐकल्यावर पुणे जिल्ह्यातील धर्मप्रेमींना जाणवलेली सूत्रे आणि महिलांनी केलेले प्रयत्न !

पुणे जिल्ह्यातील काही धर्मप्रेमी एक मासापासून प्रत्येक गुरुवारी असणारा भावसत्संग ऐकत आहेत. भावसत्संग ऐकून धर्मप्रेमींना जाणवलेली सूत्रे आणि त्यांनी कृतीच्या स्तरावर केलेले प्रयत्न येथे दिले आहेत.

सौ. सोनाली आंबुलकर, नर्‍हे

१. व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांत वाढ होऊन परात्पर गुरु डॉक्टरांवरील श्रद्धा आणि समष्टी सेवेची तळमळ वाढणे

‘भावसत्संग ऐकल्यापासून माझ्यातील सकारात्मकता वाढली आहे. माझ्या व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांत वाढ होऊन माझी परात्पर गुरु डॉक्टरांवरील श्रद्धा वाढली. ‘कृतीला भाव कसा जोडायचा ?’, हे मला शिकायला मिळाले. मला गुरुदेव आणि गुरुपादुका यांचे दिवसभरात अनेक वेळा स्मरण होते. माझी समष्टी सेवेची तळमळ वाढली.

२. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी ‘आपत्काळात गुरुच आपले रक्षण करणार आहेत’, याची जाणीव करून दिल्याने स्थिर रहाता येणे

सत्संगामुळे ‘गुरुमाऊली आपल्या समवेत असल्यामुळे कठीण प्रसंगांची तीव्रता न्यून होते’, हे मी अनुभवले. सत्संगामधून ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आपल्याला साधनेच्या पुढच्या टप्प्यावर नेत आहेत’, असे मला जाणवते. त्या प्रत्येक सत्संगात ‘आपत्काळात गुरुच आपले रक्षण करणार आहेत’, याची जाणीव करून देत असल्यामुळे काहीही घडले, तरीही स्थिर रहाता येते.

३. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या वाणीतून चैतन्य मिळून ते पुढील सप्ताहातील भावसत्संगापर्यंत टिकून रहाते.’

कु. वैष्णवी देशपांडे

१. भावसत्संग ऐकतांना आध्यात्मिक स्तरावर लाभ होणे

‘१.७.२०२१ या दिवशी सकाळपासून माझे डोके पुष्कळ दुखत होते. त्यामुळे ‘आज भावसत्संग ऐकू नये’, असा विचार माझ्या मनात येत होता. मी लगेच प्रार्थना करून भावसत्संग ऐकू लागले. थोड्याच वेळात माझे डोके दुखणे उणावले. सत्संग ऐकतांना मला पुष्कळ जांभया येत होत्या. (‘कु. वैष्णवी यांना आध्यात्मिक स्तरावर लाभ होत होता.’ – संकलक)

२. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या चैतन्यदायी आवाजाने माझ्या अंगावर रोमांच येत होते.’

डॉ. नीलेश लोणकर

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या वाणीतील चैतन्यामुळे आवरण निघणे

‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या वाणीतील या भावसत्संगातून मला पुष्कळ प्रमाणात चैतन्य मिळते. मला सत्संगाला बसल्यानंतर पुष्कळ ग्लानी येते आणि आवरण काढूनही ग्लानीचे प्रमाण उणावत नाही. त्या वेळी ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या वाणीतून मिळणार्‍या चैतन्यामुळे आवरण निघत आहे’, असे मला वाटते.’

सौ. स्वाती शिंदे, कासुर्डी

सत्संगातून मिळणार्‍या चैतन्याचे स्वतःभोवती संरक्षककवच निर्माण झाल्याचे जाणवणे

‘भावसत्संग ऐकतांना मला पुष्कळ चांगले वाटते. ‘सत्संगातून मिळणार्‍या चैतन्याचे स्वतःभोवती संरक्षककवच निर्माण झाले आहे’, असे मला जाणवत होते. सत्संगात पंचतत्त्वांविषयी माहिती ऐकून त्यांच्याप्रती मनात कृतज्ञताभाव निर्माण झाला. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा आवाज ऐकताक्षणी भाव जागृत होतो, तसेच मनाची एकाग्रता होते. सत्संगात इतर साधक प्रयत्न सांगत असतांना त्यांतून पुष्कळ शिकायला मिळते.’

श्री. मनोहरलाल उणेचा

भावसत्संगामुळे ‘परात्पर गुरु डॉ. आठवले आपल्या समवेत असून तेच आपल्याकडून हिंदु राष्ट्र निर्मितीचे कार्य करवून घेणार’, अशी श्रद्धा निर्माण होणे

‘भावसत्संगामुळे ‘ईश्वर जसा त्याच्या भक्तांच्या समवेत असतो, त्याप्रमाणे गुरुदेवही आपल्या समवेत आहेत. तेच आपल्याकडून हिंदु राष्ट्र निर्मितीचे कार्य करवून घेणार आहेत आणि आपल्याला मोक्षाला घेऊन जाणार आहेत’, अशी श्रद्धा माझ्या मनात निर्माण झाली.’ (लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक ११.७.२०२१)

राष्ट्रीय भावजागृती सत्संगामुळे धर्मप्रेमी महिलांनी केलेले वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न !

‘पुण्यातील मंतरवाडी (हडपसर, पुणे) येथील धर्मप्रेमी महिला मागील काही आठवड्यांपासून गुरुवारचा भावसत्संग ऐकत आहेत. तेव्हापासून त्यांच्यामध्ये भावसत्संगाविषयी गोडी निर्माण झाली आहे. त्या भावसत्संगाच्या दिवशी त्यांची वैयक्तिक कामे बाजूला ठेवून अथवा पर्यायी नियोजन करून भावसत्संगाला वेळेत उपस्थित रहातात. मागील काही भावसत्संगांत पंचतत्त्वांविषयी सूत्रे सांगितली होती. ती ऐकल्यापासून दैनंदिन कृती करत असतांना त्यांचा पंचतत्त्वांविषयीचा कृतज्ञताभाव वाढला आहे. त्यांच्याकडून प्रत्येक पंचमहाभूताप्रती कृतज्ञता व्यक्त होत आहे. काही धर्मप्रेमी महिला घरात पाण्याचा काटकसरीने वापर करू लागल्या आहेत आणि त्याविषयी इतरांचेही प्रबोधन करत आहेत.’ – श्री. महेश पाठक, पुणे (११.७.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक