सीमेवरील तणावाची स्थिती पहाता सैन्याने आकस्मिक कारवाईसाठी सिद्ध रहावे ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे युद्धाचे संकेत

नवी देहली – भारताच्या इतिहासात प्रथमच विद्यमान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सार्वजनिकरित्या तिन्ही सैन्यदलाला सतर्क रहाण्याचा संकेत दिला आहे. राजनाथ सिंह यांनी ‘देशाच्या सीमेवर तणावाची परिस्थिती आहे. त्यामुळे अगदी अल्प कालावधीच्या आदेशावर कोणत्याही आकस्मिक कारवाईसाठी सैन्याला सिद्ध रहायला हवे’, असे म्हटले आहे. वायूदलाच्या कमांडर परिषदेमध्ये राजनाथ सिंह यांनी हे विधान केले. चीन सीमेवर वाढणार्‍या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

राजनाथ सिंह पुढे म्हणाले की, भविष्यात जे कुठलेही युद्ध होईल, त्यात वायूदलाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे वायूदलाला विविध माध्यमांतून आणखी सशक्त करावे लागणार आहे.

अमेरिकेच्या गुप्तचर खात्याकडून भारताला चीनपासून सतर्क करणारा अहवाल सादर !

नुकताच अमेरिकेच्या गुप्तचर खात्यानेही भारताला सतर्क करणारा अहवाल सादर केला आहे. यात म्हटले आहे की,

१. विस्तारवादी भूमिका असलेल्या चीनने तिबेट गिळंकृत केलाच आहे आणि आता त्याचा डोळा भारतातील काही भागांवर आहे. त्यामुळे चीनने सीमा भागांत सध्या हालचाली वाढवल्या आहेत.

२. सीमावाद सोडविण्याविषयी भारताचे मत मान्य न करता चीन त्याची भूमिका पुढे रेटत आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ भारताने हाती घेतलेल्या विकास प्रकल्पांना खो घालण्याचा प्रयत्न चीनकडून सातत्याने होत आहे. वादग्रस्त ठिकाणी असलेले सैन्य मागे हटवण्यास चीन दिरंगाई करत आहे.

३. अरुणाचल प्रदेश आणि तिबेट यांच्यातील वादग्रस्त सीमा भागात चीनने एक नवे गावच वसवले आहे. त्या गावात सध्या १०० लोक रहातात.