श्री. पराग रत्नाकर भुरे यांना देवद आश्रमात आल्यावर जाणवलेली आणि शिकायला मिळालेली सूत्रे

१. देवद आश्रमात पाऊल ठेवताच एखाद्या मंदिरात आल्याचे जाणवणे

देवद, पनवेल येथील सनातनचा आश्रम

‘२६.९.२०१९ या दिवशी देवद आश्रमात पाऊल ठेवताच मला ‘मी एखाद्या मंदिरात आलो आहे’, असे जाणवले. पादत्राणे काढल्यावर लगेच हात-पाय धुऊन समोर ठेवलेल्या पेल्यातून डोक्यावर तीर्थ शिंपडणे आणि डोळ्यांना लावणे, पावसातून आल्यावर रेनकोट व्यवस्थित हँगरला टांगणे इत्यादी नियमांचे काटेकोर पालन आश्रमात केले जाते. आश्रमात असलेले असे शिस्तबद्ध वातावरण सर्वांनाच आल्हाददायक वाटते; परंतु शिस्त कुणाला आवडत नसते. आश्रमातील हे शिस्तबद्ध वातावरण मला पुष्कळ आवडले.

२. आश्रमातील भोजनकक्षात असलेला सूचनाफलक हा अतिशय सुंदर माहिती देणारा एक आरसाच असणे

आश्रमात असलेला भोजनकक्षातील सूचनाफलक हा अतिशय सुंदर माहिती देणारा एक आरसाच आहे. त्या फलकांवर आश्रमातील खोल्यांचे निरीक्षण करून त्यांच्यातील तीव्र, मध्यम आणि मंद स्वरूपातील अव्यवस्थितपणाच्या केलेल्या नोंदी अन् त्यासाठी घेण्यात येणार्‍या प्रायश्चिताचे स्वरूप पाहून मला स्वतःची पुष्कळ लाज वाटली. ‘कदाचित् मला आश्रमात प्रवेश मिळणार नाही’, असे मला वाटले. पाण्यात साखर किंवा मीठ विरघळावे, तसा मी आश्रमात आल्यावर माझ्याकडून नियमांचे पालन सहजच होऊन मी त्या शिस्तबद्ध वातावरणात सामील झालो.

३. आश्रमात आल्यावर स्वभावदोष उफाळून न येणे

आश्रमातील वास्तव्याच्या २ दिवसांत माझी चिडचिड, तसेच त्यामुळे येणारी प्रतिक्रिया आणि विचित्रपणे मोठ्याने चिडून बोलणे झाले नाही. मला माझ्या स्वभावदोषांवर नियंत्रण ठेवता आले.’

– श्री. पराग रत्नाकर भुरे, नाशिक, महाराष्ट्र. (२८.९.२०१९)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक