वडिलांच्या निधनानंतर आलेल्या अनुभूतींतून साधनेची अनिवार्यता लक्षात आलेली ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. सायली रवींद्र देशपांडे (वय १२ वर्षे) !

कु. सायली रवींद्र देशपांडे ही केवळ १२ वर्षांची मुलगी ! या वयात ‘केवळ खेळणे-बागडणे’ हेच त्यांचे विश्व असते. २०.५.२०२१ या दिवशी सायलीच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन झाले. या वयात स्वतःच्या वडिलांच्या झालेल्या अकस्मात् मृत्यूमुळे तिच्या बालमनावर आघात झाला; परंतु ‘आपण रडलो, तर बाबांना पुढे सद्गती मिळण्यात अडथळे येतील’, या तिच्या आईच्या वाक्याचा अर्थ तिच्या बालमनाला कळला आणि तिने स्वतःला सावरले. त्या वेळी तिच्या मनाची झालेली विचारप्रक्रिया भल्याभल्यांना थक्क करणारी आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले सांगतात, ते हेच या दैवी बालकांचे वेगळेपण ! तिच्या बाबांच्या निधनानंतर कोरोनाच्या तीव्र संकटामुळे मी तिकडे जाऊ शकत नव्हते. तिच्याशी भ्रमणभाषवरून होणार्‍या संपर्कातून जाणवलेली सायलीची गुणवैशिष्ट्ये आणि ती सूत्रे तिच्याच शब्दांत येथे दिली आहेत.’ – श्रीमती मेघना वाघमारे (आजी)

कु. सायली देशपांडे

या लेखातील काही सूत्रे आपण ९ नोव्हेंबर या दिवशी पाहिली. आज उर्वरित सूत्रे पाहूया.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/525680.html

४. सायलीची अन्य गुणवैशिष्ट्ये

४ उ. ‘संतांच्या चैतन्याचा कसा लाभ होतो !’, हे लक्षात येऊन कृतज्ञता वाटणे : ‘मी दुसर्‍या दिवशी काहीतरी करण्यासाठी परसदारी गेले होते. तेव्हा मला बाबांची पुष्कळ आठवण येत होती. त्या वेळी ‘तिकडे कुणीतरी आहे’, असे मला वाटले; मात्र मला काहीच दिसले नाही. त्यामुळे मी पुष्कळ अस्वस्थ झाले. आई व्यस्त होती; म्हणून मी स्वतःच उत्तरदायी साधकांना संपर्क केला. त्यांनी मला समजावले आणि ‘नामजप कर’, असे सांगितले; परंतु माझी स्थिती तशीच होती. त्यामुळे मी पू. पात्रीकरकाकांना (सनातनचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकर यांना) भ्रमणभाष केला आणि त्यांना माझ्या मनाच्या स्थितीविषयी सांगितले. त्यांनी मला समजावले. त्यांनी माझ्यासाठी वेळ दिला. तेव्हा मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. पू. पात्रीकरकाकांशी बोलल्यानंतर मला हलकेपणा जाणवला.’’ त्यानंतर ‘संतांच्या चैतन्याचा कसा लाभ होतो !’, हेही माझ्या लक्षात आले.

(‘साधारणपणे घरातील मोठी व्यक्ती गेली की, मुले पोरकी होतात. त्यांना नातेवाइक किंवा कुणाचाही आधार नाही’, अशी स्थिती समाजात पहायला मिळते; परंतु सनातन संस्थेचे कुटुंब मोठे आणि व्यापक आहे. सायलीला अस्वस्थ वाटत असतांना साधक आणि संत यांनी तिच्याशी बोलून तिला त्या अस्वस्थेतून बाहेर काढले. यातून ‘साधक आणि संतच एकमेकांना आधार देऊ शकतात’, हेही लक्षात येते आणि साधकांना अशा प्रकारे घडवणार्‍या परात्पर गुरु डॉक्टरांप्रती कोटीशः कृतज्ञता व्यक्त होते.’ – संकलक)

श्रीमती मेघना वाघमारे

५. सायलीचा भगवंताप्रती असलेला कृतज्ञताभाव !

१. एकदा माझ्या मनात विचार आला, ‘देवाने आज मला वडिलांच्या निधनाचे दुःख दिले; पण त्याने चांगल्या अनुभूती देऊन आनंदही दिला.’ त्यानंतर मला पुन्हा एकदा ‘आकाशात ‘ॐ’चा आकार दिसणे, घर आणि अंगण येथे दैवी कण दिसणे, मृत्यूनंतर बाबांची स्थिती चांगली असल्याचे कळणे’, अशा अनुभूती आल्या.

२. एकदा मी आजीशी (श्रीमती मेघना वाघमारे यांच्याशी) बोलत असतांना माझ्या मनात विचार आला, ‘आम्ही साधना करत नसतो, तर काय झाले असते ? आम्ही साधना करत आहोत; म्हणून भगवंताच्या कृपेमुळे सगळे नीट होत आहे. तोच आम्हाला सांभाळत आहे.’ भाववृद्धी सत्संगात ‘पुढे आणखी कठीण काळ येणार आहे. आपण श्री गुरूंवर दृढ श्रद्धा ठेवली पाहिजे’, असे सांगितले होते. ते मला आठवले आणि माझ्या मनात ‘साधना करायलाच हवी’, हा विचार पक्का झाला.’

(‘आपण समाजात पाहिले, तर कुटुंबप्रमुख गेल्याने पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. सगळ्यांचे मानसिक संतुलन बिघडते आणि त्यांना सावरायला बराच कालावधी लागतो; परंतु ‘साधनेमुळे अशा प्रसंगात मनुष्य पटकन सावरतो’, हे एका १२ वर्षांच्या मुलीकडून शिकायला मिळते आणि सगळ्यांनी साधना करण्याची अनिवार्यता अधोरेखित होते.’ – संकलक)      

(समाप्त)

– कु. सायली रवींद्र देशपांडे (वय १२ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.५.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक