वडिलांचे निधन झाल्यावर समंजसपणे वागणारी आणि प्रगल्भ असणारी कु. सायली देशपांडे (वय १२ वर्षे) !

कु. सायली रवींद्र देशपांडे ही केवळ १२ वर्षांची मुलगी ! या वयात ‘केवळ खेळणे-बागडणे’ हेच त्यांचे विश्व असते. २०.५.२०२१ या दिवशी सायलीच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन झाले. या वयात स्वतःच्या वडिलांच्या झालेल्या अकस्मात् मृत्यूमुळे तिच्या बालमनावर आघात झाला; परंतु ‘आपण रडलो, तर बाबांना पुढे सद्गती मिळण्यात अडथळे येतील’, या तिच्या आईच्या वाक्याचा अर्थ तिच्या बालमनाला कळला आणि तिने स्वतःला सावरले. त्या वेळी तिच्या मनाची झालेली विचारप्रक्रिया भल्याभल्यांना थक्क करणारी आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले सांगतात, ते हेच या दैवी बालकांचे वेगळेपण ! तिच्या बाबांच्या निधनानंतर कोरोनाच्या तीव्र संकटामुळे मी तिकडे जाऊ शकत नव्हते. तिच्याशी भ्रमणभाषवरून होणार्‍या संपर्कातून जाणवलेली सायलीची गुणवैशिष्ट्ये आणि ती सूत्रे तिच्याच शब्दांत येथे दिली आहेत.’ – श्रीमती मेघना वाघमारे (आजी)

कु. सायली देशपांडे

कु. सायलीच्या वडिलांचे निधन झाल्यावर जाणवलेली सायलीची प्रगल्भता !

‘त्यानंतर वेळोवेळी भ्रमणभाषवरून सायलीशी बोलतांना तिने काही सूत्रे सांगितली.

१. बाबांचे निधन झाल्याचे समजल्यानंतर 

अ. ‘मला काही वेळ पुष्कळ रडू आले.

आ. काही वेळाने माझ्या मामाचा (श्री. धैवत वाघमारे यांचा) भ्रमणभाष आला. त्याने मला ‘नामजप आणि प्रार्थना कर’, असे सांगितले. त्याच्याशी बोलल्यानंतर माझे मन पुष्कळ शांत झाले.

२. बाबांचा मृतदेह रुग्णालयातून घरी आणल्यानंतर

२ अ. समंजसपणा : बाबांचा मृतदेह पाहिल्यानंतर मला पुन्हा काही वेळ रडू आले; पण आईने सांगितले, ‘‘त्यांचा पुढचा प्रवास चांगला व्हायला हवा असेल, तर आपण रडायला नको. नाहीतर ते आपल्यात अडकतील आणि त्यांना गती मिळण्यात अडथळा येईल.’’ तेव्हा ‘बाबांची साधना पुढे चालू रहायला हवी’; म्हणून मी रडणे आवरले. आम्ही रडलो, तर त्यांचे मन आमच्यात अडकेल आणि त्यांना पुढे जाता येणार नाही. तसेच आमची आणि आमच्या बाबांचीही साधना होणार नाही’, असे मला वाटले.

२ आ. बाबांच्या तोंडवळ्यावर तेज आणि उत्साह जाणवत होता. त्यांच्याकडे पाहून शांत वाटत होते.

२ इ. त्यांची त्वचा पिवळसर दिसत होती.

३. बाबांचा मृतदेह अग्नीसंस्कारासाठी नेल्यानंतर

३ अ. वडील हयात असतांना त्यांनी सांगितलेले न ऐकल्यामुळे पश्चात्तापाचे अश्रू आल्याचे सायलीने सांगणे : त्या वेळी मी पुष्कळ रडले; पण माझे ते रडणे पश्चात्तापाचे होते. बाबा असतांना मी त्यांच्याकडे काही गोष्टींसाठी हट्ट करायचे, चिडायचे किंवा काही वेळा त्यांनी सांगितलेले मी ऐकायचे नाही. ‘मी तसे करायला नको होते. माझे चुकले’, हे आज माझ्या लक्षात येत आहे. ‘एखाद्याला वडील नसले, तर काय स्थिती होते ?’, ते आज मी अनुभवत आहे. बाबा असतांना मला त्याची जाणीव नव्हती; म्हणून मला पश्चात्तापाने पुष्कळ रडू आले; मात्र आता मी माझ्या आईशी तसे वागणार नाही. मी तिचे सगळे ऐकीन आणि तिला त्रास देणार नाही.’’

श्रीमती मेघना वाघमारे

सायलीचे हे बोलणे ऐकून माझे (श्रीमती मेघना वाघमारे (आजी)) मन थक्क झाले. ‘मोठ्या माणसांकडूनही असा विचार होत नसावा’, असे मला वाटले.

४. सायलीच्या बोलण्यातून लक्षात आलेली तिची अन्य गुणवैशिष्ट्ये

४ अ. उत्तम निरीक्षणक्षमता

१. सायलीने पुढे सांगितले की, बाबांना ज्या दिवशी रुग्णालयात भरती केले, त्या दिवसापासून घरातील अंबाबाईच्या तांदळ्याचा (देवीचा मुखवटा) शेंदरी रंग काळपट होत गेला आणि देहावसानानंतर तो चांगलाच काळपट झाला’, असे माझ्या लक्षात आले.

(या संदर्भात तिच्या आईला (माझ्या मुलीला, श्रीमती धनश्री देशपांडे हिला) विचारल्यावर तिने ते योग्य असल्याचे सांगितले. घरात काही अघटित घडणार असल्यास देवीचा तांदळा काळवंडतो. ‘यापूर्वीही असे घडले होते’, असे सायलीच्या आईने सांगितले.)

२. बाबांचे पार्थिव अग्नीसंस्कारासाठी नेल्यावर माझे आकाशाकडे लक्ष गेले. तेव्हा मला आकाशात ढगांमध्ये ‘ॐ’चा आकार झालेला दिसला.

३. दुचाकी चढवण्या-उतरवण्यासाठी जो सिमेंटचा उतार केला आहे, तेथील अंगणात मला अनेक दैवी कण दिसले.

४. घरात आल्यावर बैठकीच्या खोलीतील परात्पर गुरु डॉक्टरआजोबांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) छायाचित्रावर मला एक मोठा सोनेरी रंगाचा दैवी कण दिसला.

४ आ. सूक्ष्मातील जाणणे : अन्य घरांत एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर वातावरणात दाब जाणवतो; मात्र आमच्या घरात तसा दाब जाणवत नव्हता. (तिने हेच सूत्र पुन्हा पाचव्या दिवशीही भ्रमणभाषवर बोलतांना मला सांगितले.)

४ इ. आध्यात्मिक संज्ञांचा अर्थ कळणे : ‘बाबांची मृत्यूनंतरची स्थिती चांगली आहे. त्यांच्याकडून चांगली स्पंदने येत आहेत’, असे तिने सांगितल्यावर मला पुष्कळ समाधान वाटले.

४ ई. सकारात्मक राहून परिस्थिती स्वीकारणे आणि आनंदी रहाणे : बाबांच्या निधनानंतर एका साधिकेचे माझ्या आईशी बोलणे झाले. ती साधिका आईला म्हणाली, ‘‘पहाटे नामजपाच्या वेळी मला रवींद्र यांचा मृतदेह दिसला. मला ते दृश्य पाहून पुष्कळ रडू आले. नामजपाच्या वेळी समोर ठेवलेल्या परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्राकडे पाहून मी त्यांना म्हटले, ‘हा तर माझा दादा आहे. माझ्या दादाला असे काय झाले ?’ आणि मी पुन्हा रडू लागले. तेव्हा मला ‘रडू नको. हा बघ, तुझा दादा माझ्या जवळ आहे’, असे परात्पर गुरूंचे छायाचित्र बोलत आहे’, असे मला जाणवले.’’ त्यावर सायली मला म्हणाली, ‘‘म्हणजे बाबा परात्पर गुरु डॉक्टरआजोबांच्या जवळ आहेत. परात्पर गुरु डॉक्टरआजोबा आमच्या जवळ आहेत, म्हणजेच बाबा आमच्या जवळच आहेत. हो ना गं आजी !’’ आणि सायली खुद्कन हसली. त्या चिमुरडीचे हे बोलणे ऐकून ‘एका डोळ्यात आसू आणि एका डोळ्यात हसू’, अशी माझी स्थिती झाली. ‘प्राप्त परिस्थिती सकारात्मक राहून स्वीकारणे आणि त्यातून मार्ग काढून समाधानी अन् आनंदी रहाणे’, हे सायलीचे गुण माझ्या लक्षात आले.                                     (क्रमश:)

– श्रीमती मेघना वाघमारे (आजी) आणि श्री. धैवत वाघमारे (मामा), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.५.२०२१)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषि मुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.