१. प्रदर्शनाची सेवा रात्री उशिरा संपल्यावर भूक लागल्यामुळे ढाब्यावर जेवण करण्याचे ठरवणे; परंतु तेथे गेल्यावर ढाबा बंद होऊन त्या परिसरात कोणतेच दुकान उघडे नसणे
‘वाराणसी येथील जागृत देवस्थान ‘संकटामाता मंदिर’ येथील ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांच्या प्रदर्शनाची सेवा झाल्यानंतर आम्ही निवासस्थानी यायला निघालो. पुष्कळ पाऊस पडत होता आणि रात्रीचे साडेबारा वाजले होते. रात्री उशीर झाल्यामुळे खूप भूक लागली होती; म्हणून आम्ही जेवण बाहेर ढाब्यावरच करण्याचे ठरवले; परंतु ज्या ढाब्यावर जेवणाचे नियोजन केले, तो ढाबा बंद झाला होता. त्या परिसरात कोणतेच दुकान उघडे नव्हते.
२. वाराणसी येथील अनोळखी आणि शांत परिसरात एका अनोळखी उपाहारगृहाच्या मालकांनी रात्री उशिरा रोट्या देऊन साहाय्य करणे
थोडे पुढे गेल्यावर त्या शांत परिसरात एक उपाहारगृह उघडे दिसले. तेथे जाऊन बसल्यावर आम्ही मागणी करणार इतक्यात त्या उपाहारगृहाच्या मालकांनी सांगितले, ‘‘आता पाकगृह बंद झाले आहे. त्यामुळे उपाहारगृहामध्ये जेवणाची व्यवस्था होऊ शकत नाही; पण पाऊस ओसरेपर्यंत तुम्ही इथे बसू शकता. काही अडचण नाही. रात्री एवढ्या उशिरा तुम्हाला कुठेही जेवण मिळणार नाही. तुम्ही कुठे जाणार आहात ?’’ मी त्यांना सांगितले, ‘‘काही अंतरावर जाऊन तिथे आम्ही काहीतरी खाऊ.’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘एवढ्या रात्री तुम्हाला तिथे काही मिळणे कठीण आहे.’’ नंतर त्यांनी त्यांच्यासाठी बनवलेल्या जेवणातले जेवण आम्हाला दिले. तंदूरमधून त्यांनी स्वत:साठी अजून काही रोट्या बनवल्या आणि त्यातल्या आम्हाला दिल्या. अशा प्रकारे वाराणसी क्षेत्र अनोळखी असूनही आणि ती व्यक्ती आमच्या ओळखीची नसतांना त्या शांत परिसरात त्या व्यक्तीने आम्हाला साहाय्य केले.
३. उपाहारगृहाचे मालक आणि कर्मचारी आपुलकीने अन् प्रेमाने वागणे, तसेच त्यांनी पोटभर गरमगरम जेवण खाऊ घातल्यावर ‘देव कसे साहाय्य करतो ?’, याची जाणीव होणे
‘देव आहे आणि तो कसे साहाय्य करतो ?’, याची जाणीव आम्हाला त्या क्षणी झाली. आम्हाला जेवण देणारी व्यक्ती एका उपाहारगृहाची मालक होती. त्यांचीही निघायची वेळ झाली होती. एका व्यक्तीसमवेत संभाषण करतांना ते म्हणाले, ‘‘इन भैया लोगोंको विदा करने के बाद हम जायेंगे ।’’ (‘या दादांना निरोप दिल्यावर आपण जाऊ.’) निघण्याच्या वेळीसुद्धा ते आम्हाला व्यवस्थित भेटले. त्यांचे कर्मचारीही चांगले होते. आम्ही एवढ्या उशिरा गेलो, तरी ते आमच्या समवेत चांगल्या पद्धतीने वागत होते. ‘आमच्यामुळे इतका उशीर झाला, तरी त्यांना कुठलीही अडचण आली नाही’, असा त्यांच्या तोंडवळ्यावरचा भाव होता. ते आपुलकीने आणि प्रेमाने वावरत होते अन् त्यांनी आम्हाला गरमगरम जेवण पोटभर जेऊ घातले. जेवण झाल्यानंतर ते आम्हाला सोडण्यासाठी बाहेर आले. तेव्हा बाहेर पाऊस पडत होता आणि पावसामुळे पुष्कळ चिखल झाला होता. तेव्हा ते म्हणाले, ‘दुचाकी सावकाश चालवा.’
४. धर्मप्रसाराचे कार्य करतांना ‘परात्पर गुरु डॉक्टरांचे सूक्ष्म रूपाने साधकांकडे किती लक्ष असते ?, तसेच त्यांचे तत्त्व किती मोठ्या प्रमाणात कार्यरत असते ?’, याची जाणीव होणे
‘आम्हाला जेवण देणारी ती व्यक्ती नसून साक्षात् देवच आला होता’, याची जाणीव देवाने आम्हाला करून दिली. जेवणानंतर त्यांच्या समवेत झालेल्या संभाषणातून लक्षात आले की, ते प्रखर हिंदुत्वनिष्ठ आहेत आणि धर्मासाठी कार्य करण्याची त्यांची सिद्धता आहे. त्यांना ‘सनातन प्रभात’ पाक्षिकाचा विषय सांगितल्यावर त्यांनी ‘आमच्याकडे चालू करा’, असेही सांगितले. ‘धर्मप्रसाराचे कार्य करतांना परात्पर गुरु डॉक्टरांचे सूक्ष्म रूपाने साधकांकडे किती लक्ष असते ? तसेच त्यांचे तत्त्व किती मोठ्या प्रमाणात कार्यरत असते ?’, याची जाणीव झाली.
या संपूर्ण प्रसंगात श्री संकटामाता, काशी विश्वेश्वर, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी खूप कृतज्ञता वाटत होती. ‘हे श्रीकृष्णा, तुला अपेक्षित अशी धर्मप्रसाराची सेवा तूच आमच्याकडून करवून घे’, अशी तुझ्या चरणी भावपूर्ण प्रार्थना आहे.’
– श्री. शुभम् पवार आणि श्री. शशांक सिंह, वाराणसी (१६.१२.२०१९)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |