फोंडा येथे प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ कै. डॉ. मंजुनाथ देसाई यांना श्रद्धांजली !

कै. डॉ. मंजुनाथ देसाई

फोंडा, ४ नोव्हेंबर (वार्ता.) – द्रविड ब्राह्मण संघ गोवा, ब्राह्मण महासंघ गोमंतक आणि गोमंतक पंचद्रवीड सहकारी पतसंस्था फोंडा यांच्या वतीने येथील विश्‍व हिंदु परिषद सभागृहात शिरशिरे, बोरी येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ तथा शल्यविशारद कै. डॉ. मंजुनाथ देसाई यांना श्रद्धांजली वहाण्यात आली.

फोंड्यातील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. राजेंद्र देव, हृदयरोग तज्ञ डॉ. (श्रीमती) ललना बखले आणि गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवृत्त प्राध्यापिका डॉ. शशिकला सहकारी यांनी डॉ. मंजुनाथ देसाई यांच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा प्रारंभ केला.

सध्याच्या घडीला समाजाचे अधःपतन झालेले आहे. अशा समाजामध्ये राहूनसुद्धा डॉ. मंजुनाथ कधीही पैशांच्या मागे लागले नाहीत. त्यांचे गुण आत्मसात करून त्यांच्याप्रमाणे होणे आणि त्यांच्यासारखी माणसे निर्माण करणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत डॉ. राजेंद्र देव यांनी या वेळी व्यक्त केले.

श्री. अजित केरकर म्हणाले, ‘‘डॉ. मंजुनाथ देसाई या देव माणसाची जागा आणखी कुणी घेऊ शकेल, असे वाटत नाही. केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित करावे.’’

श्री. राजेंद्र देसाई म्हणाले, ‘‘त्यांची सर्व गुणवैशिष्ट्ये असलेले एक पुस्तक प्रकाशित करून त्या पुस्तकाचा संदर्भ ग्रंथ म्हणून वैद्यकीय शिक्षणासाठी उपयोग केल्यास, ती खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल.’’

सनातन संस्थेचे डॉ. पांडुरंग मराठे श्रद्धांजली वहातांना म्हणाले, ‘‘डॉ. मंजुनाथ हे सर्वसाधारण माणूस नव्हते. ते उच्चकोटीचे कर्मयोगी होते.’’ डॉ. मंजुनाथ यांच्यातील प्रेमभाव, रुग्णांबद्दलची तळमळ आदी गुणवैशिष्ट्ये सांगणारी काही उदाहरणे डॉ. मराठे यांनी या वेळी दिली.

या कार्यक्रमात द्रवीड ब्राह्मण संघाचे अध्यक्ष श्री. दिलीप ढवळीकर, प्रशासकीय अधिकारी श्री. अरुण देसाई, श्री. संजय घाटे, बोरीचे माजी सरपंच श्री. नरेश नाईक, श्री. पंढरीनाथ उमर्ये, श्री. मोहन आमशेकर, श्री. राजकुमार देसाई आदींनी डॉ. मंजुनाथ यांना श्रद्धांजली वाहिली.

कार्यक्रमाच्या शेवटी मडकईचे आमदार आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. सुदिन ढवळीकर श्रद्धांजली अर्पण करतांना म्हणाले, ‘‘त्यांच्या जाण्यामुळे गोव्याची पुष्कळ हानी झाली आहे. डॉ. मंजुनाथ यांची गोवा वैद्यकीय महाविद्यालयात कंत्राटी पद्धतीने (वार्षिक विशिष्ट वेतनावर) नेमणूक करण्यात आली असूनही त्यांनी तळमळीने रुग्णसेवा केली आणि यातूनच त्यांची रुग्णसेवेची तळमळ दिसून येते.’’ श्रद्धांजली वहातांना श्री. सुदिन ढवळीकर यांचा कंठ दाटून आला आणि खूप भावूक झाले.

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शुभदा सावईकर यांनी केले.