इतरांची प्रेमाने काळजी घेणारी, परात्पर गुरु डॉक्टरांप्रती भाव असलेली आणि दळणवळण बंदीच्या काळाचा सुयोग्य वापर करणारी ६४ टक्के आध्यात्मिक पातळीची ढवळी, फोंडा, गोवा येथील कु. सान्वी धवस (वय १० वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. सान्वी धवस ही एक आहे !
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले |
(वर्ष २०१६ मध्ये कु. सान्वी धवस हिची आध्यात्मिक पातळी ६३ टक्के होती. – संकलक)
१. आईची काळजी घेणारी प्रेमळ सान्वी !
१ अ. आईला व्यायामाची आठवण करून देणे : ‘मला पाठदुखीचा त्रास आहे. त्यामुळे पाठीच्या स्नायूंना बळकटी येण्याच्या दृष्टीने आधुनिक वैद्यांनी मला काही व्यायाम करायला सांगितले आहेत. सान्वी मला प्रतिदिन ‘व्यायाम केला का ? किती वेळा केला ?’, असे विचारते. एखाद्या दिवशी तिने मला व्यायाम करतांना पाहिले नसेल, तर ती मला आठवण करून देते.
१ आ. आईला स्वतःहून औषध आणि पाणी आणून देणे : मला प्रतिदिन रात्री ११ वाजता एक औषध घ्यायचे असते. याविषयी मी तिच्याशी कधी बोलले नव्हते. मला ठरलेल्या वेळेत औषध घेतांना पाहून तिने स्वतःहून त्याच वेळेत मला औषधाची गोळी आणि पाणी द्यायला चालू केले.
१ इ. आईचा तीव्र पाठदुखीचा त्रास समजून घेऊन तिच्या साहाय्याला धावणे : एके दिवशी तीव्र पाठदुखीमुळे मला खाली वाकता येत नव्हते. रुग्णालयात जाण्यासाठी मला खाली वाकून पायात ‘सँडल्स’ घालायच्या होत्या. मी काही बोलण्यापूर्वीच सान्वीने धावत जाऊन माझे ‘सँडल्स’ आणले आणि ते घालण्यासाठी मला साहाय्य केले. तिच्या या कृतीने मला पुष्कळ आश्चर्य वाटले. ‘एखाद्या गोष्टीची आवश्यकता आहे’, हे सांगण्यापूर्वीच तिने ती कृती पूर्ण केलेली असते.
२. संस्कृत स्तोत्रे लवकर आत्मसात करणे
रामनाथी आश्रमात असतांना सान्वी नियमित स्तोत्रपठण करत असे. दळणवळण बंदीच्या काळात आम्ही घरी रहात होतो. त्या वेळी सान्वी स्तोत्रपठण करण्यासाठी शेजारच्या काकूंकडे जाऊ लागली. त्या काकूंनी मला सांगितले, ‘‘अमेरिकेत राहूनही सान्वीचे संस्कृत उच्चार चांगले आहेत आणि तिने संस्कृत स्तोत्रे लवकर आत्मसात केली आहेत.’’
३. सान्वी करत असलेली साधना
सध्या सान्वी स्वभावदोष सारणीत प्रतिदिन स्वतःच्या ३ चुका लिहिते आणि १ घंटा नामजप करते.
४. दळणवळण बंदीच्या कालावधीचा सुयोग्य वापर करून घरातील कामे शिकणारी, तसेच कल्पकतेने नवनवीन गोष्टी बनवणारी सान्वी !
दळणवळण बंदीच्या काळात काही वेळा सान्वीला घरात बसून कंटाळा येत असे; मात्र तिला कोरोना महामारीचे गांभीर्य लक्षात आले होते. त्यामुळे तिने बाहेर घेऊन जाण्यासाठी कधीही हट्ट केला नाही. ती नवनवीन गोष्टी शिकून स्वतःला व्यस्त ठेवत असे. जेव्हा तिला मोकळा वेळ मिळत असे, तेव्हा ती कल्पकतेने घरातल्या घरात नवीन गोष्टी बनवत असे. या ३ मासांच्या कालावधीत सान्वीशी खेळायला कुणी नव्हते आणि तिची शाळाही ‘ऑनलाईन’ चालू होती. त्यामुळे ती घरातील कामे शिकून मला साहाय्य करू लागली. तिने पोळ्या करायला शिकण्याचा प्रयत्न केला, तसेच ती खिचडी करायला शिकली. ‘मायक्रोव्हेव’चा वापर करून स्वयंपाक कसा करायचा ?’, हे तिने समजून घेतले. मी आजारी असतांना ती माझ्यासाठी सूप बनवून देत असे.
५. परात्पर गुरु डॉक्टरांप्रती अपार भाव असल्याने स्वतःला आवडत नसतांनाही ‘बालसंस्कारवर्गात शिकायला मिळालेल्या अनुभवांचे चलत्चित्र (‘व्हिडिओ क्लिप’) बनवण्यास सिद्ध होणे
५ अ. चित्रीकरण करायला विशेष आवडत नसतांनाही ‘परात्पर गुरु डॉक्टरांना चलत्चित्र केलेले आवडणार आहे’, असे सांगितल्यावर ते करण्यास सिद्ध होणे : सान्वी ‘ऑनलाईन’ बालसंस्कारवर्गाला उपस्थित रहात असे. ‘या वर्गातून तिला काय शिकायला मिळाले’, याविषयी तिचे अनुभव सांगणारे एक लहानसे चलत्चित्र (‘व्हिडिओ क्लिप’) सिद्ध करून पाठवायचे होते. आरंभी सान्वीला ते करण्यात फारसा रस नव्हता. याचे कारण ते हिंदीतून करायचे होते आणि सान्वीला चांगले हिंदी येत नाही, तसेच तिला स्वतःचे चित्रीकरण करायलाही फारसे आवडत नाही. त्यावर तिच्या बाबांनी ‘या चलत्चित्रामुळे (‘व्हिडिओ क्लिप’मुळे) इतरांना कसे साहाय्य होणार आहे’, हे तिला समजावून सांगितले. ‘परात्पर गुरु डॉक्टरांना चलत्चित्र सिद्ध केलेले आवडणार आहे’, असे सांगितल्यावर ती ते करायला सिद्ध झाली.
५ आ. चलत्चित्र बनवण्यासाठी सान्वीने केलेली पूर्वसिद्धता !
१. चलत्चित्र बनवण्याच्या पूर्वसिद्धतेचा एक भाग म्हणून तिने बालसंस्कारवर्गांत शिकायला मिळालेली सर्व सूत्रे इंग्रजी भाषेत लिहून काढली आणि त्यांचा सराव केला.
२. त्यानंतर तिने आम्हाला ‘यातील कोणती सूत्रे हिंदीतून घ्यायची ?’, हे विचारले.
३. तिला सूत्रे निवडून दिल्यावर तिने त्यांचे हिंदीत भाषांतर केले आणि बाबांकडून तपासून घेतले.
४. ही सूत्रे तयार झाल्यावर तिने चालतांना, खेळतांना आणि दैनंदिन कृती करतांना सातत्याने अनेक घंटे त्यांचा सराव केला.
५ इ. चित्रीकरणाच्या वेळी शांत आणि स्थिर राहून ते पूर्ण करणे : एरव्ही सान्वीला एकाच ठिकाणी पुष्कळ वेळ बसणे कठीण जाते; मात्र तिने स्थिरतेने बसून चित्रीकरण करायला पूर्ण साहाय्य केले. त्या दिवशी चित्रीकरण पूर्ण झाल्यावरच तिने भोजन केले.
चित्रीकरण झाल्यावर मी तिला विचारले, ‘‘आरंभी तू चलत्चित्र करायला सिद्ध नव्हतीस; मात्र आता तुला हे सर्व कसे जमले ?’’ त्यावर सान्वी म्हणाली, ‘‘हे सर्व मी केवळ परात्पर गुरु डॉक्टरांसाठी केले आहे.’’
६. स्वभावदोष
उलट उत्तरे देणे आणि राग येणे.
‘परात्पर गुरु डॉक्टर, तुमच्याच कृपेमुळे मला सान्वीच्या गुणांमधून शिकायची संधी मिळत आहे. तुम्ही या बालसाधकांच्या माध्यमातून ज्या प्रेमाने आमची काळजी घेत आहात, त्यासाठी मी आपल्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. वैशाली धवस, ढवळी, फोंडा, गोवा. (१४.१०.२०२०)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता