२.११.२०२१ या दिवशी धनत्रयोदशी, धन्वन्तरि जयंती आणि यमदीपदान आहे. त्या निमित्ताने…

धनत्रयोदशी

यालाच बोली भाषेत ‘धनतेरस’ असे म्हटले जाते. आश्विन कृष्ण पक्ष त्रयोदशीच्या दिवशी व्यापारी तिजोरीचे पूजन करतात. व्यापारी वर्ष दिवाळी ते दिवाळी असे असते. व्यापारी नव्या वर्षाच्या हिशोबाच्या वह्या या दिवशीच आणतात. जमा आणि खर्च झालेल्याचा आढावा ठेवून लक्ष्मीची पूजा करतात.

धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन सुवर्ण विकत घेण्याचा प्रघात आहे. त्यामुळे वर्षभर घरात धनलक्ष्मी वास करते. वास्तविक लक्ष्मीपूजनाच्या वेळी वर्षभराचा जमाखर्च द्यायचा असतो. त्या वेळी धनत्रयोदशीपर्यंत शेष राहिलेली संपत्ती प्रभुकार्यासाठी व्यय केल्यास सत्कार्यात धन खर्च झाल्यामुळे धनलक्ष्मी शेवटपर्यंत लक्ष्मीरूपाने रहाते. धन म्हणजे पैसा. हा पैसा घामाचा, कष्टाचा, धवलांकित असलेला आणि वर्षभरात पै पै करून जमा केलेला असावा.’

– परात्पर गुरु परशराम माधव पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.


धन्वन्तरि जयंती

धनत्रयोदशीचा दिवस आयुर्वेदाच्या दृष्टीने धन्वन्तरि जयंतीचा आहे. वैद्य या दिवशी धन्वन्तरिचे (देवांचा वैद्य) पूजन करतात. कडुनिंबाच्या पानांचे तुकडे आणि साखर असे ‘प्रसाद’ म्हणून लोकांना देतात. कडुनिंबाची उत्पत्ती अमृतापासून झाली आहे. धन्वन्तरि हा अमृतत्त्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. कडुनिंबाची पाच-सहा पाने प्रतिदिन खाल्ली, तर व्याधी होण्याची शक्यता नाही. एवढे कडुनिंबाचे महत्त्व आहे; म्हणून या दिवशी तोच धन्वन्तरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो.

धन्वंतरी जन्म : ‘धन्वन्तरीचा जन्म देव आणि राक्षस यांनी केलेल्या समुद्रमंथनातून झाला. भगवान धन्वन्तरि एका हातात ‘अमृत कलश’, दुसर्‍या हातात ‘जळू’, तिसर्‍या हातात ‘शंख’ आणि चौथ्या हातात ‘चक्र’ घेऊन जन्माला आला.


यमदीपदान

धनत्रयोदशीच्या दिवशी यमदेवतेला प्रार्थना करून ‘अकाली मृत्यू (अपमृत्यू) येऊ नये’, यासाठी सायंकाळी कणकेच्या तेलाचे १३ दिवे घराच्या बाहेरच्या बाजूस दक्षिणेला तोंड करून लावतात. यालाच ‘यमदीपदान’ असे म्हणतात. २.११.२०२१ या दिवशी यमदीपदान करावे.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘सण साजरे करण्याच्या योग्य पद्धती आणि शास्त्र’)