उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. श्रीपाद प्रसाद डहाळे हा एक आहे !
चि. श्रीपाद प्रसाद डहाळे याची आजी सौ. कुंदा प्रकाश डहाळे यांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
१. सुनेचे गर्भारपण
१ अ. तिसर्या मासात सुनेची सोनोग्राफी केल्यावर आधुनिक वैद्यांनी बाळाची वाढ नीट न झाल्याचे सांगणे आणि ‘असे मूल मतिमंद आणि विकलांग असू शकते’, असे सांगून गर्भपात करण्याचा समुपदेश देणे, त्यानंतर तिने दुसर्या आधुनिक वैद्यांकडे जाणे : ‘माझ्या सुनेची पहिल्या मासात सोनोग्राफी केली असता ‘मूल चांगले आहे’, असे आधुनिक वैद्यांनी सांगितले. तिसर्या मासात सोनोग्राफी केल्यावर आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘मुलाची वाढ नीट झाली नाही. त्याच्या यकृतावर दोन ठिपके (स्पॉट) दिसत आहेत आणि किडनीला सूज आहे. असे मूल मतिमंद आणि विकलांग असू शकते.’’ त्यांनी आम्हाला गर्भपात करण्याचा समुपदेश दिला. त्यामुळे आम्हा सर्वांना पुष्कळ ताण आला; पण आम्ही कोणत्याही निर्णयाप्रत पोचू शकलो नाही. आम्ही दुसर्या आधुनिक वैद्यांचा समुपदेश घेण्याचे ठरवले. दुसर्या आधुनिक वैद्यांकडे गेल्यावर त्यांनी सुनेच्या वेगवेगळ्या तपासण्या केल्या. तिच्या प्रत्येक मासाला तपासण्या चालूच होत्या. असे दोन मास उलटले.
१ आ. नामजप आणि धर्मरथावरील साधकांच्या व्यवस्थेची सेवा मनापासून करणे : फेब्रुवारी मासात नागपूरला धर्मरथ आला होता. धर्मरथ आमच्या घरासमोरच उभा होता. धर्मरथातील सर्वांची व्यवस्था आमच्या घरी करण्यात आली होती. या माध्यमातून प.पू. गुरुदेवांनी आम्हा सर्वांना सेवेची संधी दिली, चैतन्य दिले आणि धीर दिला. आम्ही प.पू. डॉक्टर आणि कुलदेवता यांना सतत प्रार्थना करत होतो. माझ्या सुनेने सर्व सेवा मनापासून केल्या. ती पू. अशोक पात्रीकर यांनी सांगितलेला ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप आणि देवाची पूजा नित्यनेमाने करत होती. माझ्या मुलाची आणि सुनेची श्री साईबाबांवर श्रद्धा आहे. ते अधूनमधून श्री साईंच्या दर्शनाला जात होते.
१ इ. त्यानंतर सोनोग्राफी आणि सर्व चाचण्यांचे अहवाल सर्वसाधारण (नॉर्मल) आले. आधुनिक वैद्यांनीही बाळात कोणताही दोष नसल्याचे सांगितले. त्यामुळे आम्हाला हायसे वाटले.
२. जन्मानंतर
२ अ. सुरेख गोंडस बाळ पाहून कृतज्ञता वाटून आनंदाश्रू येणे : ३.५.२०१८ या दिवशी सुनेच्या पोटी एक सुरेख गोंडस बाळ जन्माला आले. जन्मतःच डोळे उघडलेले आणि न रडता हात-पाय हालवून खेळत असलेल्या त्या बाळाला पाहिल्यावर आम्हा सर्वांना कृतज्ञता वाटून आमचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले. माझा मुलगा प्रसाद श्री गणेशचतुर्थीचे व्रत करत होता आणि बाळाचा जन्मही चतुर्थीचाच आहे, हे विशेष आहे.
२ आ. श्रीपाद कुणाजवळही जातो. सर्व जण सहजपणे त्याच्याकडे आकृष्ट होतात आणि त्याला घेतात.
२ इ. त्याला बरे नसले, तरी तो फारसा रडत नाही किंवा झोपूनही रहात नाही.
२ ई. त्याला खाण्यापिण्याची आवड नावड नाही. तो सर्व खातो. त्याला लोणी अधिक आवडते.
२ उ. उतम स्मरणशक्ती : श्रीपाद २ मासांचा असतांना मी माझ्या दुसर्या मुलाकडे गेले होते आणि ३ मासांनी परत आले. आल्यानंतर श्रीपादने मला लगेच ओळखले आणि तो हसला.
२ ऊ. सात्त्विकतेची आवड
१. त्याला प्रतिदिन टिळा लावायला आवडते.
२. तो ५-६ मासांचा असल्यापासून त्याला समवेत घेऊनच पूजा करावी लागते. नाहीतर तो रडतो. पूजा करतांना त्याला उदबत्ती लावायला आणि देवाजवळ दिवा लावायला आवडते.
३. आम्ही नामजप, स्तोत्रे म्हटल्यावर आणि जयघोष केल्यावर त्याला आनंद होतो.
४. आरत्या म्हणत आणि नामजप करत त्याला झोके दिले, तरच तो झोपतो. तो झोपतांना झोळीतून एक पाय बाहेर काढतो. तेव्हा वसुदेव बाळकृष्णाला टोपलीत घालून यमुना नदीतून गोकुळाकडे घेऊन जात असतांना बाळकृष्णाच्या दर्शनासाठी यमुना नदीचे पाणी वरवर येते आणि श्रीकृष्ण टोपलीतून पाय बाहेर काढून तिला दर्शन देतो, या प्रसंगाची मला आठवण होते.
५. त्याला परात्पर गुरुदेव आणि प.पू. भक्तराज महाराज पुष्कळ आवडतात. विशेषतः प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राकडे पाहून तो त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो.
६. शिवरात्रीला आमच्या घरी प्रवचन होते. तेव्हा त्याने शांतपणे पूर्ण प्रवचन ऐकले.
ईश्वराच्या कृपेने आम्हाला हे सुंदर बाळ लाभले. यासाठी आम्ही ईश्वरचरणी कोटी कोटी वेळा कृतज्ञ आहोत. ‘श्रीपादचे शरीर, मन आणि बुद्धी यांचे रक्षण होऊन तो एक चांगला साधक होऊ दे’, हीच ईश्वरचरणी शरणागतभावाने कळकळीची प्रार्थना आहे.
३. स्वभावदोष : हट्टीपणा’
– सौ. कुंदा प्रकाश डहाळे (चि. श्रीपादची आजी), नागपूर (१०.८.२०१९)