जाफराबाद (जिल्हा जालना) येथे राज्य परिवहन महामंडळाच्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांचा लाठीमार !

राज्य परिवहन मंडळाची बसगाडी अडवल्याप्रकरणी ४७ जणांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद !

( प्रतिकात्मक छायाचित्र )

जाफराबाद (जिल्हा जालना) – राज्य परिवहन मंडळाच्या कामगारांच्या विविध मागण्यांसाठी २७ ऑक्टोबरपासून चालू झालेले आंदोलन २९ ऑक्टोबरच्या सकाळी कृती समितीकडून स्थगित करण्यात आले होते; मात्र जालना जिल्ह्यातील जाफराबाद आगारातील आंदोलनकर्त्यांनी आंदोलन थांबवण्यास नकार दिला. आगारातून बाहेर काढण्यात येणार्‍या बसगाडीच्या खाली जाण्याचा प्रयत्न करणार्‍या आंदोलकांवर पोलिसांनी सौम्य लाठीमार करून आंदोलकांना पळवून लावले. बसगाडी अडवल्याप्रकरणी पोलिसांनी ४७ आंदोलनकर्त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी मध्यस्थी करून आंदोलन मिटवण्याचा प्रयत्न केला; मात्र आंदोलनकर्त्यांनी राज्य परिवहन महामंडळ, तसेच सरकार यांच्या विरोधात घोषणा देऊन शिवीगाळ केली. यामुळे एस्.टी.च्या अधिकार्‍यांनी पोलिसांचे साहाय्य घेऊन आंदोलनकर्त्यांवर सौम्य लाठीमार केला. या वेळी जाफराबाद आगार परिसरात मोठा गोंधळ झाला होता. पोलीस, राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी आणि आंदोलनकर्ते यांच्यात बाचाबाची झाली.