सर्वच नाही, तर केवळ घातक फटाक्यांवर बंदी ! – सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण

विशेष समुदायाच्या विरोधात बंदी नसल्याचेही न्यायालयाचे स्पष्टीकरण

नवी देहली – देशात फटाक्यांवर १०० टक्के बंदी नाही. ती केवळ हानीकारक रसायनांपासून निर्मित फटक्यांवरच आहे. ‘हरित’ फटाक्यांवर नाही. आमच्या आदेशाचे कठोरपणे पालन केले जावे, असे स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाने फटक्यांविषयीच्या याचिकेवर सुनावणी करतांना दिले.

न्यायालयाने म्हटले आहे की,

१. देशाच्या अन्वेषण यंत्रणा कशा आहेत, हे सर्वांना ठाऊक आहे. आम्ही केवळ ‘ग्रीन फटक्यां’च्या (अल्प प्रदूषणकारी फटाक्यांच्या) विक्रीला संमती दिली होती; मात्र बाजारात सर्वच प्रकारच्या फटक्यांची विक्री होत आहे.

२. फटाक्यांच्या प्रदूषणामुळे प्रतिवर्षी देहलीचे काय हाल होतात, हे सर्वांनाच ठाऊक आहे. व्यापक जनहितार्थ फटाक्यांवर बंदी आणली आहे. ही बंदी विशिष्ट समुदायाविरुद्ध असल्याची धारणा काही लोक बनवत आहे. तसे नसल्याचे आम्ही स्पष्ट करत आहोत. आनंद घेण्यासाठी कुणाच्या आयुष्याचा खेळ करता येणार नाही. आम्ही येथे मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी आहोत.