अमेरिकेने भारताला परत केल्या २४८ प्राचीन वस्तू !

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेने भारताला २४८ प्राचीन वस्तू परत केल्या आहेत. या वस्तूंची अनेक वर्षांपूर्वी चोरी करण्यात आली होती. या वस्तूंमध्ये १२ व्या शतकातील कांस्याच्या नटराज मूर्तीचाही समावेश आहे. भारतातील एक मंदिरातून वर्ष १९६० मध्ये ही मूर्ती चोरण्यात आली होती. नटराजाच्या मूर्तीखेरीज नंदिकेश्‍वर आणि कंकल मूर्तीदेखील चोरण्यात आल्या होत्या.

यापूर्वीही अमेरिकेने भारताला प्राचीन वस्तू परत केल्या होत्या; परंतु मोठ्या प्रमाणात वस्तू परत करण्याचे काम प्रथमच झाले आहे. ज्या २४८ वस्तू परत केल्या गेल्या आहेत, त्यांपैकी २३५ वस्तू तस्कर सुभाष कपूर याच्याकडे आढळून आल्या. सध्या तो अमेरिकेत कारागृहात आहे. त्याच्या अन्य एका साथीदारालाही अटक करण्यात आली आहे. त्याने भारतासह, पाकिस्तान, अफगाणिस्तान, श्रीलंका, थायलंड आदी देशांतून प्राचीन वस्तू चोरल्या होत्या.