पाकचे डावपेच !

संपादकीय

पाकचे डावपेच ओळखून भारतियांनी राष्ट्रप्रेमी भूमिका घेणे आवश्यक !

सौजन्य : ZEE NEWS

सध्या भारताचे पाकशी विविध स्तरांवर छुपे युद्ध चालू आहे. भारत आणि पाकिस्तान यांमध्ये नुकत्याच झालेल्या ‘टी-२०’ विश्वचषक क्रिकेट सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. हा क्रिकेटचा सामना खिलाडू वृत्तीने खेळला गेलेला नव्हता, हे पाकिस्तानच्या नेत्यांनी सामन्यानंतर घेतलेल्या खुनशी भूमिकेतून उघड झाले. हे ढळढळीतपणे दिसत असतांना काही भारतीय मात्र एकमेकांना खिलाडू वृत्तीचे डोस देत आहेत. पाकने सामना जिंकला म्हणून भारतीय संघातील मुसलमान धर्मीय महंमद शमी याला ‘ट्रोल’ (सामाजिक माध्यमांवरून टीका करणे) केल्याची अफवा पसरवल्यानंतर हे ठळकपणे समोर आले. ही अफवा पसरवणार्‍यांमागे पाकमधील हस्तक होते, हे उघड झाले; परंतु दुर्दैवाने तोपर्यंत पाक त्याच्या डावपेचांत यशस्वी झाला, असे खेदाने म्हणावेसे वाटते. याला कारणीभूत ठरला तो भारतियांचा तथाकथित निधर्मीपणा आणि हिंदूंविषयीचा पूर्वग्रहदूषितपणा !

तसे पहाता पाकने आजपर्यंत कोणताच क्रिकेटचा सामना खिलाडू वृत्तीने खेळलेला नाही. त्याकडे नेहमी भारतद्वेषी मानसिकतेतूनच पाहिले आहे. पाकिस्तानातील घराघरांतून हीच मनोवृत्ती दिसून येते. त्यामुळे क्रिकेट खेळणे, हे एकप्रकारचे छुपे युद्ध झाले आहे. या सामन्यानंतर पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी इस्लामी राष्ट्रांसमोर ‘पाक भारताशी काश्मीर प्रश्नावर सामंजस्याची भूमिका घेऊ इच्छितो’, अशी वल्गना केली ‘आताच्या परिस्थितीत भारताशी त्यावर चर्चा करणे योग्य होणार नाही’, अशी दर्पाेक्तीही केली. ‘चोराच्या मनात चांदणे’ याप्रमाणे इम्रान खान यांच्या विविध वक्तव्यांतून पाकची भारतासंबंधीची मानसिकता लक्षात येते. हे भारतियांच्या लक्षात केव्हा येणार ? हा गंभीर प्रश्न आहे.

सूज्ञ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक पाकिस्तानचे षड्यंत्र अन् निधर्मीपणातील फोलपणा जाणून आहेत; मात्र त्यांना भारतात ‘तालिबानी’, ‘धर्मांध’ असे म्हणून हिणवले जाते. त्यामुळे पाकच्या डावपेचांना यशस्वी करण्यासाठी भारतीयच नकळतपणे कामाला लागतात, अशी गत सध्या झाली आहे. उद्या पाकिस्तानशी युद्ध झाल्यास भारतीय सैन्य पाकला खडे चारण्यास सक्षम असले, तरी अंतर्गत युद्धात भारताची दाणादाण उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भारतियांनी अंतर्गत युद्धाचा गांभीर्याने विचार करायला हवा !