मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी घेतली गृहमंत्र्यांची भेट !

हेमंत नगराळे

मुंबई – मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी २६ ऑक्टोबर या दिवशी मंत्रालयात येऊन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. ‘कॉर्डेलिया क्रूझ’वरील कारवाईच्या प्रकरणी अमली पदार्थविरोधी पथकाकडून करण्यात आलेल्या कारवाईच्या प्रकरणी अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी अमली पदार्थविरोधी पथकाचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या कारवाईतील पंच प्रभाकर साईल यांनी या प्रकरणातील साक्षीदार किरण गोसावी आणि समीर वानखेडे यांनी लाच मागितल्याचा आरोप केला आहे. याविषयी प्रभाकर साईल यांनी समीर वानखेडे यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे. मुंबईतील या सर्व घडामोडींविषयीच हेमंत नगराळे यांनी गृहमंत्र्यांची भेट घेतल्याचे म्हटले जात आहे.