(म्हणे) ‘कॉ. पानसरे हत्येचे अन्वेषण ‘ए.टी.एस्.’कडे सोपवा !’ – भाकपचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन 

अन्वेषणातून स्वतःला हवा तसा निष्कर्ष न मिळाल्यामुळे साम्यवादी थयथयाट करत आहेत. या प्रकरणात हिंदुत्वनिष्ठांचा हात नसल्याचे पुढे आल्याने साम्यवाद्यांचे पित्त खवळले असून त्यामुळेच ते अशी मागणी करत आहेत. हिंदुद्वेषापोटी हे निवेदन दिले गेले आहे, हे हिंदू जाणून आहेत ! – संपादक 

कॉ. गोविंद पानसरे

कोल्हापूर – कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येला साडेसहा वर्षांचा कालावधी उलटूनही सूत्रधाराचा अद्याप छडा लागलेला नाही. सरकारच्या नाकर्तेपणामुळे मारेकरी मोकाट आहेत. त्यामुळे या हत्येचे अन्वेषण ‘ए.टी.एस्.’कडे सोपवा, अशा मागणीचे निवेदन भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (भाकपच्या) शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना दिले. (कॉ. गोविंद पानसरे हत्येप्रकरणी कोल्हापूर पोलिसांचे विशेष अन्वेषण पथक नेमण्यात आले असून या पथकाने आजपर्यंत नेमके काय अन्वेषण केले ? प्रारंभी या प्रकरणात समीर गायकवाड यांना अटक केल्यापासून ते आतापर्यंत प्रत्येक वेळी विशेष पथकाने नवीन संशयित आणले आणि न्यायालयासमोर नवीन ‘अन्वेषण’ ठेवले. इतके होऊनही अद्याप विशेष अन्वेषण पथक काहीच सिद्ध करू शकलेले नाही. त्यामुळे या प्रकरणात आजपर्यंत ज्यांना अटक झाली, त्यांनी आणखी किती काळ कारागृहात काढायचे ? उद्या या प्रकरणात सर्व संशयितांची निर्दोष मुक्तता झाल्यास ज्यांचे आयुष्य कारागृहात गेले, त्याची भरपाई कोण देणार ? – संपादक)

जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दोषारोपपत्र अपूर्ण अवस्थेत आहे. काही आक्रमणकर्त्यांना जामीन मिळाला, तर अन्य मारेकरी मोकाट आहेत. महाराष्ट्र पोलिसांना अद्याप खर्‍या सूत्रधारांपर्यंत पोचता आलेले नाही. खटल्यातील साक्षीदारांना धमकी दिली जात आहे. संबंधितांविरुद्ध तक्रार देऊनही यंत्रणेकडून कोणतीही कारवाई झालेली नाही.